नवी मुंबईतील रेल्वेच्या विविध समस्यांवर रावसाहेब दानवेंनी घेतली आढावा बैठक

नवी मुंबईतील रेल्वेच्या विविध समस्यांवर रावसाहेब दानवेंनी घेतली आढावा बैठक

नवी मुंबई शहरातील रेल्वेविषयक विविध प्रलंबित प्रश्नांसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमवेत आमदार गणेश नाईक यांची चर्चगेट येथील मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत खैरणे-बोनकोडे रेल्वे स्टेशनचे कामदेखील तातडीने हाती घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर तातडीने सर्वेक्षणाचे आदेश दानवे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे दिघ्यापाठोपाठ खैरणे-बोनकोडे स्थानक निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Raosaheb Danve held a review meeting on various railway issues in navi mumbai)

या बैठकीत दिघा रेल्वे स्थानकावर पुरवण्यात येणाऱ्या सुविधा, नवी मुंबई उपनगरीय नेटवर्कवरील विविध स्थानकांवर स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे आदी मुद्द्यांचा चर्चा झाली. तसेच या वेळी समस्यांचे तात्काळ निराकरण आणि उपयोजना करण्यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, नवी मुंबई महापालिका आयुक्त, मुंबई रेल विकास निगमचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.

त्याशिवाय, वाशी ते ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावर दिघा स्थानकाची निर्मिती करण्यात आली. या स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून या स्थानकाचे लोकार्पण करावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी यावेळी केली. त्यावर रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत आणखी एक बैठक घेतली. ज्यामध्ये अतिवृष्टीमुळे महाड येथील पूरस्थिती, कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम, वन स्टेशन वन उत्पादनाला चालना, प्रकल्पग्रस्तांना भरपाईचा त्वरित तोडगा काढण्यासाठी करावयाच्या उपाययोजना इत्यादीबाबत चर्चा करण्यात आली.

नवी मुंबईत दिघा आणि खैरणे-बोनकोडे या दोन नवीन रेल्वे स्थानकांस मंजुरी मिळाली होती. त्यापैकी दिघा रेल्वे स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, खैरणे रेल्वे स्टेशनचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता खैरणे-बोनकोडे रेल्वे स्टेशनचे कामदेखील तातडीने हाती घेण्याची मागणी संजीव नाईक यांनी बैठकीत केली. त्यावर या स्थानकाच्या निर्मितीसाठी व्यवहार्यता रिपोर्ट म्हणजेच फिजिबिलिटी सर्वे करण्याचे आदेश दानवे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे खैरणे-बोनकोडे स्थानक निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबई पालिकेला जबाबदारी द्या

खैरणे-बोनकोडे रेल्वे स्थानक उभारण्याची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेला देऊन वाणिज्य वापराचे अधिकार महापालिकेस दिल्यास निश्चित नवी मुंबई महानगरपालिका खैरणे रेल्वे स्थानक लवकरात लवकर काम पूर्ण होऊ शकेल. याच अनुषंगाने रेल्वे प्रशासनाला निर्देश देण्याचे विनंती रेल्वे राज्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.


हेही वाचा – मुंबईची जलवाहिनी ठाण्यात फुटली; लाखो लिटर पाणी वाया, ‘या’ भागांमध्ये पाणी कपात

First Published on: March 4, 2023 9:15 PM
Exit mobile version