दानवेंचा राजीनामा, चंद्रकांत पाटील नवे प्रदेशाध्यक्ष, लोढांची मुंबई अध्यक्षपदी वर्णी!

दानवेंचा राजीनामा, चंद्रकांत पाटील नवे प्रदेशाध्यक्ष, लोढांची मुंबई अध्यक्षपदी वर्णी!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर रावसाहेब दानवेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यानंतर त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग आला होता. अखेर, मंगळवारी त्यांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या राज्यस्तरावरील कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. रावसाहेब दानवेंनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन राज्यात आता पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष नेमावा अशी विनंती केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आशिष शेलार यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांच्यावर मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकांदरम्यान रावसाहेब दानवेंनी राज्यात जोरदार प्रचारमोहीम राबवली होती. निकालांनंतर दानवेंचा समावेश थेट केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आला. त्याशिवाय आशिष शेलार यांची देखील नंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे या दोघांवर अध्यक्षपदाचा अतिरिक्त भार होता. यात स्वत: रावसाहेब दानवेंनी नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्याबाबत पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष नव्याने नेमण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. यानंतर मंगळवारी त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली.

भाजपचं पत्र
First Published on: July 16, 2019 3:33 PM
Exit mobile version