विनयभंगाचा कट फसला, आता बलत्काराचा…, जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला व्हिडीओ

विनयभंगाचा कट फसला, आता बलत्काराचा…, जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला व्हिडीओ

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांची वादग्रस्त वक्तव्य आणि कृत्ये यामुळे ते नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने त्यांच्यावर विनयभंगाची तक्रार केली होती. मात्र, आता, याच महिलेकडून बलात्काराचा आरोप करण्यासाठी तयारी सुरू आहे, असा धक्कादायक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आज त्यांनी ट्विट करून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गाडीत बसली आहे. ही गाडी मंत्रालयाबाहेर उभी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच, ही महिला मंत्रालयात जाऊन कोणाला भेटली, कशी भेटली अशी मंत्रालयात चर्चा सुरू असल्याचंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणतात की, 354 चा कट फसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 376 ची तयारी सुरु केली आहे. 354 मध्ये नाट्यपूर्ण भूमिका घेणा-या आता या कटातही आघाडीवर आहेत. आज दुपारी त्या मंत्रालयासमोर गाडीत बसलेला व्हिडीओ मत्या कोणाला भेटल्या, कशा भेटल्या चर्चा मंत्रालयात सुरु आहे.


कलम ३४५ विनयभंग आणि लैंगिक छळाविरोधासाठी वापरले जाते. तर, बलात्काराविरोधात कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. यामुळे आता ३७६ ची तयारी सुरू असल्याचा दावा केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कळवा पुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांना भेटण्याकरता भाजपाच्या महिला पदाधिकारी रिदा राशीद भेटायला जात होत्या. एकनाथ शिंदे यांच्या गाडीजवळ जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी रिदा राशीद यांना दोन्ही हातांनी बाजूला ढकललं. यावरून रिदा राशीद यांनी मुंब्रा पोलिसांत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. जितेंद्र आव्हाडांनी रिदा  राशीद यांना स्पर्श करत पुरुषांच्या अंगावर ढकललं असा दावा करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यासाठी रिदा राशीद यांनी संबंधित घटनेचा व्हिडीओही पोलिसांना दिला.

या प्रकरणावरून संपूर्ण राज्यभर हलकल्लोळ माजला. याप्रकरणी मुंब्रा बंद ठेवण्यात आलं होतं. तसंच, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध केला होता.

First Published on: January 4, 2023 7:20 PM
Exit mobile version