रश्मी शुक्लांनी कोणाच्या आदेशाने फोन टॅप केले?

रश्मी शुक्लांनी कोणाच्या आदेशाने फोन टॅप केले?

भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील फोन टॅपिंगच्या गुन्ह्याचा तपास (क्लोजर रिपोर्ट) बंद करण्याबाबत न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालाचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. हा अहवाल न्यायालयाने फेटाळून लावला असला तरीही यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असल्याचा आणि याप्रकरणी रश्मी शुक्ला यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. कोणाच्या आदेशाने रश्मी शुक्लांनी फोन टॅप केले? आता त्यांना वाचविण्याचा कोण प्रयत्न करीत आहे, ही माहिती सभागृहासमोर आणण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. मात्र याविषयी स्थगन प्रस्ताव नाकारून बोलू न दिल्याने विरोधी पक्षाने सरकारचा निषेध करीत सभात्याग केला.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमावर बोट ठेवून पटोले यांना स्थगन मांडण्याची संधी दिली नाही. तरीही पटोले यांनी राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करणार्‍या अधिकार्‍यांची सरकार पाठराखण करीत असल्याचा आरोप करीत या प्रकरणाशी उपमुख्यमंत्र्यांचा थेट संबंध असल्याचा आरोप केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या निर्णयावरून सरकारवर हल्ला चढविला. रश्मी शुक्ला यांनी भाजप सरकारच्या कालावधीत विधिमंडळातील सदस्यांसह अनेक मान्यवरांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केले. यामुळे विधिमंडळाच्या सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला असून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. या फोन टॅपिंग प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे? कोणाच्या आदेशाने हे फोन टॅपिंग करण्यात आले? आता रश्मी शुक्ला यांना वाचविण्याचा कोण प्रयत्न करीत आहे, ही माहिती सभागृहासमोर आणण्याची मागणी पवार यांनी सभागृहात केली.

आमचे सरकार असताना आम्ही कुणाचा फोन टॅप केला नव्हता. कारण नसताना राज्यातील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले. त्यामुळे रश्मी शुक्लांना वाचवण्यामागे नेमके काय कारण आहे, कुणाच्या आदेशाने रश्मी शुक्ला फोन टॅप करीत होत्या, खटला चालला तर सूत्रधार कोण याचा पर्दाफाश होईल याची भीती वाटते का, असे सवाल पवार यांनी केले, मात्र विधानसभाध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारून कामकाज पुढे नेले. त्यामुळे संतापलेल्या विरोधी पक्षाने सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला.

महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय नेत्यांचे दूरध्वनी टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याबाबत पुणे पोलिसांनी अहवाल सादर केला, मात्र हा अहवाल न्यायालयाने फेटाळून लावत काही मुद्यांवर तपास करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा शुक्ला यांच्यावर आरोप आहे.

First Published on: December 23, 2022 4:56 AM
Exit mobile version