रत्नागिरीत करोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरलाच करोनाची लक्षणे?

रत्नागिरीत करोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरलाच करोनाची लक्षणे?

रत्नागिरीत करोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरलाच करोनाची लक्षणे दिसून आली आहेत. जिल्हा शासकीय हॉस्पिटलमध्ये ऑन ड्यूटी वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या महिला डॉक्टरसोबत ही घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दुबईतून आलेली एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असताना आता चक्क संबंधित पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार करणाऱ्या एक महिला वैद्यकीय अधिकारी करोना संशयित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरचे सॅम्पल घेतले गेले पण, ते पुण्याला पाठवलेच नाहीत. महिला डॉक्टरने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार केली आहे. १७ मार्चला ही संपूर्ण घटना घडली आहे.

महिला डॉक्टरचा जिल्हा शल्य चिकित्सकांवर आरोप

महिला डॉक्टरने केलेले आरोप जिल्हा शक्य चिकित्सकांनी फेटाळून लावले आहेत. या साऱ्या प्रकारामध्ये तथ्य नाही. ज्यावेळी संबंधित डॉक्टरने या साऱ्या प्रकाराची कल्पना दिली, तेव्हा आम्ही तातडीनं पावलं उचलली. पण, त्यानंतर हवा तसा प्रतिसाद महिला डॉक्टरकडून मिळालेला नाही. हा आरोप खोटा आहे. संबंधित डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन होण्यासाठी  विनंती देखील केली होती. पण, त्या गायब झाल्या. असा खुलासा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्डे यांनी केला आहे.

रात्री उशिरा संबंधित महिला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आली आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू लागली. त्यावेळी देखील महिला डॉक्टरला क्वारंटाईन होण्यास सांगितलं असल्याची माहिती देखील यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने डॉ . अशोक बोल्डे गुन्हा दाखल करणार आहेत. दरम्यान, करोना रुग्णाला आणण्यासाठी १०८ रुग्णवाहिकानेही नकार दिल्याचा आरोप केला गेला. शिवाय, रुग्णवाहिकेचा मोबाईलही नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात आलं आहे. आरबीएसके यांच्या गाड्यांचाही पेशंटला आणण्यासाठी नकार दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.

First Published on: March 20, 2020 4:53 PM
Exit mobile version