नाशिकसाठी लसीचे २ लाख डोस प्राप्त

नाशिकसाठी लसीचे २ लाख डोस प्राप्त

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने लसीकरणासाठी नागरीकांची गर्दी होत आहे. मात्र नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेकांना लस न घेताच माघारी परतावे लागत होते मात्र मंगळवारी जिल्हयाला २ लाख २५ हजार लसींचे डोस प्राप्त झाल्याने लसीकरणाला वेग येणार आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रार्दुभाव कमी होत असला तरी, तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर विशेष खबरदारी घेण्याच्या सुचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने लसीकरणबाबत शासनाकडूनही जनजागृती करण्यात येत आहे. याकरीता १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत शहरात २७ लाख नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यातील अनेकांचा पहिला तर काहींना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणासाठी नाशिक शहरात १३५ तर ग्रामीण भागात ४०० केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र लसींच्या पुरवठयानूसार केंद्र कमी अधिक होत असतात. शहरात तर लस घेण्यासाठी पहाटेपासूनच केंद्रावर रांगा लागलेल्या दिसून येतात.

राज्य शासनाला केंद्राकडून लसींचा पुरवठा केला जातो. त्यानंतर राज्याकडून लसींचे समप्रमाणात जिल्हयांना वाटप केले जाते. सुरूवातीला नाशिकमध्ये आठवडयातून ३० ते ४० हजार लसींचे डोस प्राप्त होत असल्याने लसीकरण केंद्रावरही मोठा गोंधळ निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत होेते. मात्र हळूहळू आता लसींचा पुरवठाही वाढविण्यात येत आहे. मंगळवारी जिल्हयाला २ लाख २५ हजार ९२० लसींचे डोस उपलब्ध झाले असून यापैकी महापालिकेला ७१ हजार डोस दिले जाणार आहेत. प्रत्येक केंद्रावर २०० डोस उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

 

लसींचे प्राप्त डोस : २ लाख २५ हजार ९२०
कोविशिल्ड : २ लाख १६ हजार
कोव्हॅक्सीन : ९ हजार ९२०
नाशिक महापालिकेसाठी ७१ हजार लस वाटप
प्रत्येक केंद्रावर २०० लस उपलब्ध करण्याच्या सूचना

 

First Published on: September 7, 2021 3:19 PM
Exit mobile version