जिल्ह्यातील निर्बंध शिथिलतेबाबत शासन निर्णयानंतरच फेरविचार

जिल्ह्यातील निर्बंध शिथिलतेबाबत शासन निर्णयानंतरच फेरविचार

जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याने १ जूनपासून निर्बंध शिथिल करावे अशी मागणी होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. नाशिक जिल्हा रेडझोन बाहेर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र निर्बंध शिथिलतेबाबत राज्य शासनाच्या निर्णयानंतरच विचार करू असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

गेल्या दोन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने आता तरी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. ज्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुतोवाच केले. त्यामुळे नाशिकमध्ये १ जूनपासून निर्बंध शिथिल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेला कडक लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधितांची कमी होणारी रुग्णसंख्या ही दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील निर्बंधामुळे रूग्णसंख्या ६ हजाराने घटली. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटही ९.२० टक्क्यांवर आला आहे ही दिलासादायक बाब आहे. परंतु तरीही कडक निर्बंध काही प्रमाणात शिथिल करतांना जीवनावश्यक वस्तुंच्या व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांना देखील वेळेचे व कोरोना विषयक नियमांचे कोटेकोरपणे पालन करून ठराविक वेळेसाठी दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना आल्यानंतर त्याप्रमाणे जिल्हास्तरावर योग्य ते निर्णय घेतले जातील असे त्यांनी सांगितले. तिसर्‍या लाटेत लहान मुलांना असलेला धोका ओळखून पावलं उचलण्यात येत आहेत. याकरीता खासगी रूग्णालयांनाही कोविड रूग्णालयांचा दर्जा देतांना उपचारासाठी परवानगी देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न, औषध प्रशासनाचे सह आयुक्त दुष्यंत भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निलेश श्रींगी, गणेश मिसाळ आदी उपस्थित होते.

जिल्हयात १२ हजार रूग्ण
आजमितीस जिल्हयात १२ हजार रूग्ण उपचार घेत आहेत. यात ८६०० रूग्णांमध्ये लक्षण आढळून आलेली नाहीत असून ३३८७ रूग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले आहे. १४८३ रूग्ण ऑक्सिजनवर असून २१० रूग्ण व्हेेंटीलेटरवर आहेत. सरकारी रूग्णालयांमध्ये मोठया प्रमाणावर बेड उपलब्ध झाले असून ऑक्सिजनची मागणीही घटली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

First Published on: May 29, 2021 4:53 PM
Exit mobile version