कोरोनासाठी महापालिकेच्या रुग्णालयात ११४ वॉर्डबॉयची भरती

कोरोनासाठी महापालिकेच्या रुग्णालयात ११४ वॉर्डबॉयची भरती

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात आधीच रुग्णसेवेचा ताण असलेल्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्यावर कोरोनामुळे कामाचा ताण अधिकच वाढला आहे. एका बाजुला डॉक्टर्सची संख्या कमी असून ती वाढवण्याची आजच्या घडीला प्रचंड गरज आहे. मात्र, डॉक्टर्सपेक्षा महापालिका रुग्णालयात कक्ष परिचर अर्थात वॉर्ड बॉय महत्वाचा असल्याचे महापालिकेने स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेने डॉक्टर्सची भरती करण्याऐवजी कोरोनासाठी कक्ष परिचरांची ११४ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करून १७ एप्रिल २०२०पूर्वी अर्ज पोस्टाने किंवा इमेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन केलं आहे.


हेही वाचा – आयपीएल स्पर्धा ‘या’ महिन्यात होणार; बीसीसीआयचा सुपर प्लॅन तयार


मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे केवळ कोरोनागस्तांची सेवा तसेच या संदर्भातील इतर कामकाज करण्यासाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारितील विशेष रुग्णालयातील रिक्त असलेली कक्ष परिचर ही पदे अर्ज मागवून भरण्यासाठी ९ एप्रिल २०२० रोजी जाहिरात देण्यात आली आहे. ही भरती प्रक्रीया केवळ कोव्हीड-१९ बाधित रुग्णांशी संबंधित असलेल्या कामकाजाशी करण्यात येत आहे. दहावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार अधिक गुणांच्या आधारे निवड यादी बनवण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा आणि जाहिरातीतील अटी व शर्ती तसंच सुचनांनुसार बिनचूक भरावा आणि आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती पीडीएफमध्ये तयार करून अर्जासह mcgm.wardboy@mcgm.gov.in या इमेल आयडीवर दिनांक १७ एप्रिल २०२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठवावा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी पोस्टाने किंवा महापालिका मुख्यालयातील गेट क्रमांक ७ या ठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये दिनांक १७ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठवावा, असे आवाहन महापालिका सामान्य प्रशासन विभागाने केलं आहे. ही जाहिरात http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शैक्षणिक अर्हता : किमान दहावी पास

वेतनश्रेणी : १८,००० रुपये ते ५६,९०० रुपये

उमेदवारांचे वय

खुल्या प्रवर्गातील उमेदवार : १८ ते ३८ वर्षे

मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार : १८ ते ४४ वर्षे

वजन व उंची

पुरुष उमेदवार : ५० कि.ग्रॅ व उंची १५७ सें.मी

स्त्री उमेदवार : ४५ कि.ग्रॅ व उंची १५० सें.मी

एकूण पदे : ११४

अनुसुचित जाती : १८

अनुसुचित जमाती : १३

विमुक्त जाती :२

भटकी जमात अ =२

भटकी जमात ब : १

भटकी जमात क : ४

भटकी जमाक ड : २

इतर मागासवर्गीय : २५

एसईबीसी : १५

ईडब्ल्युएस : १२

खुला : २२

 

First Published on: April 10, 2020 3:26 PM
Exit mobile version