एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय अधिकार्‍यांचे नाशिकमध्ये पुनर्वसन

एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय अधिकार्‍यांचे नाशिकमध्ये पुनर्वसन

नगरविकास राज्य मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अधिकार्‍यांच्या बदल्यांवरुन सुरु असलेल्या ‘कोल्ड वॉर’ चा फायदा नाशिक महापालिकेला झाल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या ज्या निकटवर्तीय अधिकार्‍यांना हटवले, त्यांपैकी एक समीर उन्हाळे यांची बदली अखेर नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय भिवंडी महापालिका आयुक्तपदी उचलबांगडी झालेल्या प्रवीण आष्टेकर यांचीही नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे. एकनाथ शिंदेच्या या दोन्ही निकटवर्तीय अधिकार्‍यांचे पुनर्वसन यानिमित्ताने नाशकात झाल्याचे बोलले जाते.
नगरविकास खात्याने १५ दिवसांपूर्वी मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर आयुक्तपदी नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांची मंगळवारी (दि. २३)अचानक उचलबांगडी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनाही तडकाफडकी बदलत त्यांच्या जागी डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकारी ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये आयुक्तपदी नेमले आहेत. विशेष म्हणजे मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या दोन महापालिका आयुक्तांची नियुक्ती काही दिवसांपूर्वीच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र या आयुक्तांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पदावरून हटवल्याची बाब ‘आपलं महानगर’ने पुढे आणली होती. मंगळवारी प्रामुख्याने ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या चार महापालिका आयुक्तांच्या बदल्या केल्या. नवी मुंबईच्या आयुक्तपदी डॉ. अभिजित बांगर यांना नेमण्यात आले. ठाण्याचे आयुक्त विजय सिंघल यांना हटवून विदेशी प्रशिक्षणावरून राज्यात परत आलेले डॉ. विपीन शर्मा यांना जबाबदारी देण्यात आली आहे. नवे आयुक्त बांगर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील असल्याचे समजते. उल्हासनगरात समीर उन्हाळेंना १५ दिवसात धक्का दिला. ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांची १५ दिवसांपूर्वीच नियुक्ती झाली होती. उन्हाळे यांच्या जागी राजा दयानिधी यांना आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अधिकार्‍यांवर पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा वचक राहिला नाही असे बोलले गेले. मात्र एकनाथ शिंदे यांचे निकटचे म्हणून ओळखले जाणारे समीर उन्हाळे यांच्यासह भिवंडी महापालिकेतून उचलबांगडी झालेले तत्कालीन आयुक्त प्रवीण आष्टेकर यांची नाशिक महापालिकेतच अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे या दोन्ही अधिकार्‍यांचे पुनर्वसन एकनाथ शिंदे यांनी नाशकात केल्याचे बोलले जात आहे. महत्वाचे म्हणजे महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्या निवृत्तीनंतर हे पद वर्षभरापासून रिक्त होते. तर दुसरे पदही दोन वर्षांपासून भरले गेले नव्हते. आता मात्र एकाच दिवशी नाशिक महापालिकेला दोन अतिरिक्त आयुक्त लाभल्याने करोनाच्या संकटकाळातही प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

First Published on: June 24, 2020 10:41 PM
Exit mobile version