मंत्रालयाची पाटी काढून सचिवालय पाटी लावा : बाळासाहेब थोरात

मंत्रालयाची पाटी काढून सचिवालय पाटी लावा : बाळासाहेब थोरात

नाशिक : महाराष्ट्रात नवीन सरकार येऊन महिना उलटून गेला तरी अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. आता तर मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. त्यामुळे मंत्रालयाची पाटी काढून त्या जागी सचिवालयाची पाटी लावण्यात यावी असा टोला काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
काँग्रेसच्यावतीने ९ ते १५ ऑगस्ट रोजी आयोजीत आझादी गौरव पदयात्रेच्या कार्यक्रमाची माहिती देण्याकरीता नाशिक येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महिना उलटूनही नवीन सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. याबाबत विचारले असता ते म्हणाले, महिना उलटूनही राज्यात मंत्रीमंडळ स्थापन न होणे ही इतिहासातील पहिलीच घटना असावी. त्यात मुख्यमंत्र्यांना सारखं दिल्लीला जावे लागते त्यामुळे आता मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आता मंत्रालयाची पाटी काढून तेथे सचिवालयाची पाटी लावा असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

खातेवाटपाच्या घोळामुळेच मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याचे त्यांनी सांगितले. १४ ऑगस्ट रोजी भाजपकडून फाळणी दिवस पाळण्यात येणार आहे याबाबत विचारले असता थोरात म्हणाले, समाजात जातीभेद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. आज जनता महागाईने त्रस्त आहे याविषयी ते बोलायला तयार नाहीत आता तर भाजपने महागाई विरोधी दिन साजरा करण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला. २०२४ ची निवडणूक डोळयासमोर ठेऊन अग्निपथ योजना आखली गेली. तरूण वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अशा वेगवेगळया योजना आखायच्या पण ४ वर्षातच पोरंग घरी बसणार आहे त्याचं काय ? भाजपनं धर्मवाद, जातीवाद वाढवल्याचा आरोपही त्यांनी केला. या पत्रकार परिषदेप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

देशाची लोकशाही धोक्यात

काँग्रेस हा पक्ष नसून एक विचारधारा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत या देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे.स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींजींच्या नेतृत्वात ‘चले जाव’ चळवळीत देश पेटून उठला. स्वातंत्र्यानंतरही पंडीत नेहरूंच्या नेतृत्वात देशाने अडचणीतूनही दमदार वाटचाल केली. युपीएच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात रोजगार हमी योजना, अन्नसुरक्षा कायदा, भूसंपादन कायदा यासारखे कायदे करण्यात आले. पण आज काळ बदलला आहे. ज्या पध्दतीने या देशाची वाटचाल सुरू आहे ते पाहता या देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याचे दिसून येते. दहशत निर्माण करून विरोधकांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

काय म्हणाले थोरात…

First Published on: August 6, 2022 4:32 PM
Exit mobile version