राज्य विकास कर्ज २०१९ ची १४ जानेवारीला परतफेड

राज्य विकास कर्ज २०१९ ची १४ जानेवारीला परतफेड

मंत्रीमंडळ बैठकीतले निर्णय

महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ६.७३ टक्के व्याजदराच्या राज्य विकास कर्ज, २०१९ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड १३ जानेवारी २०१९ पर्यंत देय असलेल्या व्याजासह १४ जानेवारी २०१९ रोजी सममुल्याने करण्यात येईल. या कर्जाची परतफेड करतांना कोणत्याही राज्यात या दिनांकास सुटी जाहीर केल्यास त्या राज्यातील अधिदान कार्यालये कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करतील. कर्जावर १४ जानेवारी २०१९ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज दिले जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप विनियम २४ (२), व २४ (३) अनुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरूपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपाशीलासह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांचे प्रदान करण्यासाठी अशा रोख्याचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागारांकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप कोषागारांकडे किंवा यथास्थिती त्याच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित केले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्यांच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि बँक खात्याच्या संबंधित तपशीलाच्या/ इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी ६.७३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०१९ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस “प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली” असे नमूद करावे तसेच हे रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्या मार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरूपात असल्यास, ते संबंधित बँकांच्या शाखेत सादर करावेत. ते कोषागार किंवा उप कोषागार येथे सादर करू नयेत. रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणाखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागारांचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/ उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील. अशी माहिती वित्त विभागाने दि. १३ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहे.

First Published on: December 13, 2018 4:22 PM
Exit mobile version