एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनपासून वंचित!

एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनपासून वंचित!

कोरोना काळात एसटी महामंडळातील सेवानिवृत्त झालेल्या अनेक एसटी कर्मचार्‍यांवर पेन्शनपासून वंचित राहण्याची पाळी आली आहेत. कारण मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून निवृत्त झालेल्या एसटी कर्मचार्‍यांना महामंडळाने वेतन तर सोडा शेवटच्या वेतनाची पेमेन्ट स्लिप न दिल्यामुळे त्यांना पेन्शनपासून वंचित राहावे लागतआहे. ज्यांनी संपूर्ण आयुष्य एसटी महामंडळाची सेवा केली, अशा कर्मचार्‍यांना आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी एसटी महामंडळात खेटा माराव्या लागत आहेत.

एसटी महामंडळाचा गलथान कारभार

कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यापासून देशातील सर्व उद्योग धंदे, व्यापार, दळणवळण सगळे ठप्प झाले. याला महाराष्ट्राची एसटीदेखील अपवाद नव्हती. मुंबई, ठाणे व पालघर या उपनगरातील अत्यावश्यक सेवेचा अपवाद वगळता राज्याच्या एसटीचे चाक थांबले होते. तरी सुध्दा राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व विभागात लॉकडाऊन काळात हजेरी भरून वेतन मिळाले आहे. मात्र तोच नियम मुंबई, ठाणे व पालघर विभागाला लागू करण्यात आलेला नाही. उलट या विभागातील कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्यात आले आहे. तसेच एप्रिल आणि मे महिन्यात मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचार्‍यांनासुध्दा आतापर्यंत वेतन मिळाले नाही. वेतन तर सोडा शेवटच्या महिन्याची वेतन स्लिपसुध्दा देण्यात आली नाही. परिणामी त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. लॉकडाउन काळात कामावर गैरहजर राहणार्‍या कामगारांना निलंबनाची कारवाई करु नये, तसेच कर्मचार्‍यांचे वेतन थकीत ठेवू नये, आणि ज्या कर्मचार्‍यांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि त्यांना मधुमेह, दमा, कॅन्सर आणि उच्च रक्तदाबाचा आजार आहे, त्यांना कामावर बोलवू नयेत, असे आव्हान राज्य सरकारकडून करण्यात आले होते. तरीसुध्दा या आवाहनाला एसटी महामंडळाने तिलाजंली देत एसटी कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्यात आली होती.

हे फार दुर्दैवी…

कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका दमा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना असतो, असे शासनाकडून वारंवार सांगण्यात येत होते. माझे वय सुध्दा 58 वर्षे असल्याने मला मधुमेह असल्यामुळे मी कामावर गेलो नाही. यासंबंधीची माहिती विभागाला पत्र लिहून दिली होती. मात्र तरीसुध्दा माझे वेतन कपात केले. तसेच वेतन पावतीसुध्दा महामंडळाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे शेवटच्या महिन्याच्या वेतन पावतीसाठी मुख्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. हे फार दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. कारण संपूर्ण आयुष्यभर एसटीला सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यावर अशी वागणूक मिळणे अपेक्षित नव्हते, अशी प्रतिक्रिया एका सेवानिवृत्त एसटी कर्मचार्‍याने नाव न सांगण्याचा अटीवर आपलं महानगरला दिली आहे.

काय आहे नियम?

कामगारांना निवृत्तीनंतर शेवटच्या महिन्याची वेतन पावती पेन्शन कार्यालयात जमा करावी लागते. त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना पेन्शन सुरू होते. मात्र एसटी महामंडळाने कोरोना काळात मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील काही सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना शेवटच्या महिन्याची वेतन पावती न दिल्यामुळे ते पेचात सापडले आहेत.

राज्यात सर्व विभागात लॉकडाऊन काळात हजेरी भरून वेतन मिळाले आहे. तोच नियम मुंबई,ठाणे व पालघर विभागात लाऊन कर्मचार्‍यांना पगार स्लिप देण्यात याव्यात. त्यामुळे त्यांना पेन्शन मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही.– शेखर कोठावळे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस
First Published on: November 30, 2020 9:22 PM
Exit mobile version