Coronavirus: ‘या’ गावात रस्ता बंद…!

Coronavirus: ‘या’ गावात रस्ता बंद…!

Coronavirus: 'या' गावात रस्ता बंद...!

महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अतिदुर्गम भोगाव खुर्द गावात बाहेरच्यांना अजिबात येऊ दिले जात नसून, नियमांचे पालन व्हावे म्हणून ग्रामपंचायतीनेही कंबर कसली आहे. सरपंच राकेश उतेकर यांनी सर्वत्र दहशत निर्माण करणार्‍या करोना विषाणू रोखण्यासाठी भोगाव खुर्दसह बुद्रुकमध्ये फवारणीचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. गावात १०० टक्के संचारबंदी लागू असून, त्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून स्वयंसेवक जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. गावातील व्यक्ती घराबाहेर पडू नये, तसेच शहरातून गावी येणार्‍या व्यक्तीला मनाई करण्यात आल्याची दवंडी ग्रामपंचायतीमार्फत दिली जात आहे. कडधान्य आणि किरकोळ वस्तुंसाठी गावातील दुकानदार सूर्यकांत कदम यांचे दुकान उपलब्ध करण्यात आले असून, दूध, तुप उपसरपंच दगडू कदम यांनी उपलब्ध केले आहे.


हेही वाचा – CoronaVirus Crisis: राज्यात १८ नवीन करोना बाधित रुग्ण, एकूण रुग्ण संख्या १०७

ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील चार वाड्यांमध्ये, तसेच कातळी गावात दररोज अंगणवाडी सेविका सुनीता पवार, राजश्री माने आणि आशा स्वयंसेविका प्रतिभा शेलार घरोघरी भेट देत आहेत. मुंबई, पुणे आदी शहरांतून आलेल्या पण मूळ गावातील व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. तसेच करोना संशयित वाटल्यास त्याच्यासाठी दोन वाहने तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचविण्यासाठी सज्ज आहेत. तसेच गावातील घरांमधील सदस्यांची वैद्यकीय तपासणीचेही आयोजन करण्यात येणार आहे. सरपंच उतेकर यांच्या नेतृत्वाखाली करोना विरोधात कालबद्ध कार्यक्रम राबविला जात असून, उपसरपंच कदम, ग्रामसेविका भोसले, पोलीस पाटील शुभांगी उतेकर, सामाजिक कार्यकर्ते नीलेश चिकणे, शिपाई रमेश कदम आदींचे सहकार्य लाभले आहे.

गाव, वाड्यांवरील घरोघरी करोना विषाणू विषयी माहिती आणि घ्यावयाची खबरदारी याची माहिती पत्रके वाटण्यात आली असून, गावातील रहिवाशांना फेसबूक आणि व्हॉटस्अ‍ॅपवर सकाळी, संध्याकाळी माहिती दिली जात आहे.

 

First Published on: March 24, 2020 7:37 PM
Exit mobile version