नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही

नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही

भाजप हा गोंधळ घालण्यासाठी अतिशय योग्य असा पक्ष आहे. कदाचित त्यांना गोंधळ कसा घालावा हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. गेल्या पाच वर्षांत ते कसे सरकार चालवत होते हे आपण पाहिलेच आहे. यापुढे भाजपला नुसताच गोंधळ घालायचा असेल आणि वाद करायचा असेल तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही. त्या ठिकाणी योग्य प्रकारे उत्तर देऊ, असे म्हणत नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर त्यावेळी ते बोलत होते.भाजप किंवा त्यांचे जे काही सहकारी असतील, त्यांनी पाच वर्षं आर्थिक दृष्टिकोनातून गोंधळ घातला. कामकाज ते चांगल्या पद्धतीने चालवू शकले नाहीत, लोकांनीच त्यांना बाहेर काढले. गोंधळ त्यांनी घातला पण काय शिकायचे आणि काय नाही शिकायचे हे आपल्यावर असते. तिथे आता स्वतःहून पुढे येऊन नवीन मुख्यमंत्र्यांचं स्वागत न करता, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान न ठेवता त्या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. कदाचित त्यांना हे दाखवायचे होतं की त्यांना किती आकडे कळतात. त्यांना किती कायदा कळतो,असा टोला देखील रोहित पवार यांनी भाजपला लगावला.

आम्ही 169 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्याचा अर्थ सर्वाधिक लोक हे महाराष्ट्र विकास आघाडीकडे होते.असे असतानाही प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी शांत होता. त्या ठिकाणी शांततेत सर्व प्रक्रिया पार पाडली. विधानसभेचा मान ठेवण ही प्रत्येक आमदाराची जबाबदारी आहे. उगाच कोणताही मुद्दा घेऊन कोणी गडबड करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू, आम्ही लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार आहोत,असेही रोहित पवार म्हणाले आहेत.

First Published on: December 1, 2019 1:55 AM
Exit mobile version