पंतप्रधान मोदींनी केलेल्या घराणेशाहीच्या टीकेवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

पंतप्रधान मोदींनी केलेल्या घराणेशाहीच्या टीकेवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई : आज देशाच्या लोकशाहीत एक अशी विकृती आहे जी कधीच भारताच्या लोकशाहीला मजबुती देऊ शकत नाही. ती म्हणजे घराणेशाहीवादी पक्ष. त्यांचा मूलमंत्र आहे पार्टी ऑफ द फॅमिली, बाय द फॅमिली अँड फॉर द फॅमिली. त्यांचा जीवनमंत्रच हा आहे की त्यांचा राजकीय पक्ष कुटुंबाचा, कुटुंबाकडून व कुटुंबासाठी चालावा. घराणेशाही प्रतिभेची शत्रू असते. त्यामुळे घराणेशाहीचे उच्चाटन देशाच्या लोकशाहीच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे काल (ता. 15 ऑगस्ट) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात जनतेला संबोधित करताना म्हटले आहे. त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Rohit Pawar’s response to PM Narendra Modi’s dynastic criticism)

हेही वाचा – भाजपच्या बाईक रॅलीत मंत्री गिरीश महाजनांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना हेल्मेटसक्तीचा विसर

घराणेशाहीच्या मोदींच्या टीकेवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, घराणेशाही वादाला उत्तर हे लोकांकडूनच देण्यात येणार. उद्या जर का लोकांना वाटले की रोहित पवारला नाकारायचे तर ते नाकारू शकतात. पण भाजपची जी भूमिका आहे, त्यातून ते फक्त राजकारण करत असल्याचेच पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे असलेले सर्व प्रमुख नेते हे कोणत्या ना कोणत्या तरी परिवारामधून आलेले आहेत, असे रोहित पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

तसेच, जर का उद्या भाजपने काँग्रेस पक्ष फोडलाच तर त्यातले जे काही नेते ते पक्षात घेतील ते देखील घराणेशाहीचेच असणार आहेत. त्याशिवाय गुजरातमध्ये देखील घराणेशाहीच सुरू आहे. एका बाजूला गांधीबद्दल बोलता आणि दुसऱ्या बाजून वरूण गांधी तुमच्याकडे आहेत. त्यामुळे भाजप जे काही बोलते करते, तो एक फुगा आहे. त्यात सोयीस्करपणे हवा भरण्यात येते. पण सोयीस्कररित्या हवा भरली तरी हा फुगा एक दिवस फुटणार आहे, असा टोला रोहित पवारांनी भाजपला लगावला आहे.

आपल्या देशाला घराणेशाहीन पोखरून ठेवले आहे. घराणेशाहीमुळे देश जोखडामध्ये बांधला गेला आहे. यामुळे देशातील अनेक लोकांचे अधिकार हिसकावून घेतले गेले आहे, असे देखील पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते. त्यांनी काँग्रेसला हा अप्रत्यक्ष टोला लगावला होता.

First Published on: August 16, 2023 4:07 PM
Exit mobile version