‘देशमुखजीने दिया रिझाईन, परमबीरजी हो गये शाईन’; आठवलेंची कविता वाचली का?

‘देशमुखजीने दिया रिझाईन, परमबीरजी हो गये शाईन’; आठवलेंची कविता वाचली का?

अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास स्टाईलने प्रतिक्रिया दिल्या आहेत. रामदास आठवले त्यांच्या मजेशीर कवितांसाठी देखील ओळखले जातात.

रामदास आठवले यांनी आज त्यांच्या खास कवितेच्या स्टाईममधून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“अनिल देशमुखजी ने दे दिया है अपने पद का रिझाईन,
इसलिए परमबीर हो गये शाईन,
खूश है बेचनेवाले वाईन
क्योंकी गृहमंत्री अनिल देशमुख जी ने दिया रिझाईन”

अशा खास कवितेमधून त्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. देशमुख यांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडी सरकारला महिनाभरात दुसरा मोठा धक्का बसला आहे. याआधी २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असं म्हटलं आहे. तसंच गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असंही या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आता दिलीप वळसे पाटील हे राज्याचे नवे गृहमंत्री असणार आहेत.

 

First Published on: April 5, 2021 10:49 PM
Exit mobile version