संघाला संविधानाच्या चौकटीत आणा? आंबेडकरांची युतीसाठी काँग्रेससमोर अट

संघाला संविधानाच्या चौकटीत आणा? आंबेडकरांची युतीसाठी काँग्रेससमोर अट

काँग्रेससोबत युती करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी ठेवली ही अट

भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकत काँग्रेससमोर आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्यातील प्रमुख अट अशी की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेस काय करणार? याची तरतूद निश्चित करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. “सध्या देशात दोन व्यवस्था कार्यरत आहेत. सरकार आणि संघ समांतर काम करत आहेत. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराला अद्याप परवानगी दिलेली नाही, तरी सुद्धा संघाच्या मोहन भागवत यांनी २२ तारखेला राम मंदिर बांधायला घेऊ, अशी भूमिका व्यक्त केली आहे. हे संविधानाला धरून नाही”, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर श्रीरामपूर येथे ख्रिस्ती परिषदेच्या निमित्ताने आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका व्यक्त केली. मोदी सरकार मनुवादी संविधान आणू पाहत आहे. मनुवादी संविधानामुळे देशातल्या अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी या सर्व घटकांना एकत्र करुन मनुवाद्यांचा विरोध करत आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

आम्ही काँग्रेसकडे अमुकतमुकच जागा द्या, अशी कोणतीही मागणी केलेली नाही. काँग्रेसने कोणत्याही १२ जागा आम्हाला द्याव्यात, अशी मागणी आम्ही केलेली आहे. आम्हाला पंतप्रधान व्हायचे नाही, पंतप्रधान काँग्रेसचाच होईल, त्यामुळे काँग्रेसला स्वतःहून युती करायचे असेल तर जागावाटपाचा आराखडा त्यांनीच द्यावा, असेही ते म्हणाले. तसेच एमआयएम आमच्याबरोबर राहणारच मात्र ते निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

First Published on: February 1, 2019 9:49 AM
Exit mobile version