घरमुंबई'सत्तेवर आलो तर सरसंघचालक मोहन भागवतांना तुरुंगात टाकू'

‘सत्तेवर आलो तर सरसंघचालक मोहन भागवतांना तुरुंगात टाकू’

Subscribe

जर आम्ही निवडून आलो, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू, असं वक्तव्य करून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

‘आम्हाला सत्ता मिळाली तर ३ महिन्यांत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना तरुंगात डांबू’, असे खळबळजनक विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी नागपुरात आयोजित सभेत केले. या सभेला एमआयएमचे आमदार वारिस पठाण, इम्तियाज जलील आणि विविध संगटनांचे नेते उपस्थित होते. आधीच राम मंदिरावरून देशातलं वातावरण तापलेलं असतानाच आता प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने एआयएमआयएमसोबत युती केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया आधीच उंचावल्या होत्या.

‘तर केंद्र सरकार देखील सहआरोपी’

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शासनदरबारी कुठलीही नोंदणी नाही. संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकवल्या जातात. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझं नाव जाणूनबुजून अडकवण्यात आलं. मात्र याचं उत्तर त्यांना आणि भाजपाला निवडणुकीत मिळेल. राज्यात त्यांना दोन आकडी जागांवर आम्ही आणू. विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना तर बेकायदेशीरपणे एके-४७ बाळगल्याच्या प्रकरणात आम्ही नागपुरच्याच तुरुंगात टाकू’, असे खळबळजनक वक्तव्य आंबेडकर यांनी केले. यावेळी ‘एखाद्या व्यक्तीकडे चाकू सापडल्यावर त्याच्याविरोधात त्वरीत गुन्हा दाखल करण्यात येतो. विजयादशमीच्या दिवशी सरसंघचालक तर खुलेआमपणे एके-४७ ची पूजा करतात. मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात विलंब का होत आहे?’ असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. ‘जर सरकारने गुन्हा दाखल केला नाही, तर सरकारदेखील सहआरोपी होईल’, असे ते म्हणाले. ‘काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना नक्षलग्रस्त भागातील खनिजसंपत्ती लुटायची आहे. म्हणून सलवा जुडूम राबवण्यात आला’, असा आरोपदेखील त्यांनी केला.

- Advertisement -

तुम्ही हे पाहिलंत का? – राज ठाकरे, ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर!

‘आरबीआय’ इतिहासजमा करायची आहे का?

‘उर्जित पटेल यांच्या जागी ‘आरबीआय गव्हर्नर’ म्हणून शक्तिकांत दास यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र दास हे प्रत्यक्षात इतिहासाचे पदवीधर आहेत. मग त्यांना आरबीआयचे गव्हर्नर का केले? ही कोड्यात टाकणारी बाब आहे. संघ आरबीआयला इतिहासजमा करायला निघाला आहे का?’ असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.

अशोक चव्हाणांकडे अधिकारच नाहीत!

दरम्यान, यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनादेखील चिमटा काढला. ‘काँग्रेसला आमच्याशी आघाडी करायची आहे, पण त्यांना ‘एआयएमआयएम’ चालत नाही. याच ‘एआयएमआयएम’च्या खासदाराचे मत त्यांनी अणूकराराच्या वेळी अडचणीत का घेतले होते? चव्हाणांनी चार वेळा बोलावले. मात्र त्यांच्याकडे आघाडी करण्याचे केंद्रीय नेतृत्वाने अधिकार दिले आहेत का? याचे उत्तर त्यांनी अद्याप दिलेले नाही. काँग्रेसला आम्ही हवे असू तर ‘एआयएमआयएम’लादेखील सोबत घ्यावेच लागेल’, असे त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – शिवसेना दुतोंडी सापासारखी – प्रकाश आंबेडकर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -