राज्यात मुलं चोरणाऱ्या टोळीबद्दल अफवा, पोलिसांकडून कारवाईचा इशारा

राज्यात मुलं चोरणाऱ्या टोळीबद्दल अफवा, पोलिसांकडून कारवाईचा इशारा

मागील काही दिवसांपासून मुंबई, मराठवाडा आणि विदर्भात मुलं चोरण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुलं चोरणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवांना वेग आला. काही जिल्ह्यांमध्ये मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असता अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

राज्यात मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याचे मेसेज किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असल्यामुळे पुणे आणि औरंगाबाद पोलिसांनी एक पत्रक जारी केलं. त्या पत्रकात नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त ज्या अकाऊंटवरून हे फेक मेसेजेस पसरवले जात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

याबाबत जारी केलेल्या पत्रकात पोलिसांनी राज्यात कोणतीही टोळी सक्रिय झाली नसल्याचं सांगितलं आहे. पंढरपूरात मुलं चोरी करण्यासाठी आलेली टोळी समजून साधुंना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता नाशिकमध्ये मित्राची मस्करी करण्यासाठी बुरखा घालून गेलेल्या एका व्यक्तीला मुलं चोरणारा आरोपी समजून जमावानं मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर मुल चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर या घटनेवरून राज्यात ही टोळी सक्रिय झाल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली.


हेही वाचा : अमरावती जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूत आग, दोन बालके जखमी


 

First Published on: September 25, 2022 3:07 PM
Exit mobile version