अमरावती जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूत आग, दोन बालके जखमी

अमरावती – अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत दोन बालके किरकोळ जखमी झाले आहे. या जखमी बालकांना पंजाबराव देशमुख रुग्णलायात दाखल करण्यात आलं आहे.

आज सकाळी लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात आग लागली. यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली. आगीची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह रुग्णांच्या नातेवाईकांनी विभागात धाव घेतली. आणि तेथील लहान मुलांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आले. यावेळी दोन मुलं किरकोळ जखमी झाले आहेत.

आग लागल्यामुळे रुग्णालय परिसरात धुराचे लोळ पसरले आहे. त्यामुळे लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. परंतु, आग अटोक्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून अद्याप याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांनी या ठिकाणी तत्काळ भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. तसंच, प्रसंगवधान दाखवल्याने त्यांनी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचेही आभार मानले.