सचिन वाझे अखेर माफीचा साक्षीदार, सीबीआय न्यायालयाने अर्ज स्वीकारला

सचिन वाझे अखेर माफीचा साक्षीदार, सीबीआय न्यायालयाने अर्ज स्वीकारला

तब्बल १०० कोटींच्या वसुलीच्या कथित आरोपांप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने माफीचा साक्षीदार होण्यासाठी केलेला अर्ज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने स्वीकारल्याची माहिती आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा अर्ज स्वीकारल्यानंतर लवकरच याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने याप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

सचिन वाझेला बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात व्हीसीद्वारे हजर करण्यात आले. यावेळी सचिन वाझेच्या वकिलांकडून माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. हा अर्ज न्यायालयाने स्वीकारल्याने सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. मंगळवार ७ जून रोजी होणार्‍या प्रत्यक्ष सुनावणीदरम्यान वाझेला प्रत्यक्षरीत्या न्यायालयात हजर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. या प्रकरणात सचिन वाझे नियमित जामीन अर्ज करणार असल्याची माहिती आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने यापूर्वीच कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली असल्याचे वृत्त होते. त्यासाठी सचिन वाझेने विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सीबीआयने त्याचा अर्ज आता स्वीकारल्याने १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडील माहिती देण्याची तयारी वाझेने दर्शवली आहे.

First Published on: June 2, 2022 6:31 AM
Exit mobile version