सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून शिवीगाळ केली जाते; परमबीर सिंह यांचा गंभीर आरोप

सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून शिवीगाळ केली जाते; परमबीर सिंह यांचा गंभीर आरोप

मुंबईः सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून शिवीगाळ केली जाते, असा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केलाय. सचिन वाझे यांना पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी दबाव होता, असा जबाब माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काल ईडीला दिला होता. त्यावरूनच आता जोरदार राजकारण सुरू झालंय.

चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची भेट झाली होती. त्यावेळी सचिन वाझे यांनी ईडीला दिलेला जबाब परत घ्यावा म्हणून देशमुख यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता. तसेच या भेटीदरम्यान दोघांमध्ये चर्चासुद्धा झाली होती, असा आरोपही परमबीर सिंह यांनी केला होता. परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेला जबाबावरून आरोपपत्रात हे नमूद करण्यात आलंय.

ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सचिन वाझे मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत असताना त्यांच्यासोबत चर्चा केली होती. यावेळी पाटील यांनी सचिन वाझे यांच्यावर दबाव आणला होता. याबरोबरच उपायुक्त पाटील आणि वाझे यांच्यामध्ये चांदीवाल आयोगासंदर्भात एक गुप्त बैठकही झाल्याचं जबाबात नोंदवण्यात आलंय. परमबीर सिंह यांच्या जबाबावरून अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात 30 नोव्हेंबर 2021 ला चांदीवाल आयोगाच्या सुनावणीवेळी भेट झाली होती. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या या गौप्यस्फोटानं एकच खळबळ उडालीय. सचिन वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा नियुक्त करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट आदेश दिले होते.

पोलीस बदल्यांची यादी अनिल परबांकडून येत होती

दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी अनिल परब आपल्याकडे देत होते, असा जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुखांनी दिलाय. त्यावरच आता अनिल परबांनी खुलासा केलाय. याबाबत कुठलीही माहिती आमच्याकडे नाही, हे नेमकं प्रकरण तपासून बघावं लागेल, अशी सावध प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परबांनी दिली होती.

बदली-पोस्टिंग प्रकरणातही परमबीर सिंह यांचा मोठा खुलासा

दुसरीकडे परमबीर सिंह यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यांना वारंवार सरकारी गेस्ट हाऊस ‘सह्याद्री’मध्ये बोलावलं जात होतं. तेथे अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली आणि पोस्टिंगची यादी देण्यात येत होती. 2020 मध्ये मुंबईच्या डीसीपीच्या बदलीचे आदेश दिले होते. तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तो आदेश मागे घेण्यास सांगितले होते. सीताराम कुंटे यांनी आपल्याला व्हॉट्सअॅपवर मेसेज केल्याचा दावा परमबीर सिंह यांनी केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच आदेश असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. यानंतर आपण आदेश मागे घेतल्याचे परमबीर सिंह यांनी आपल्या खुलाशात म्हटले. सोबतच तो व्हॉट्सअॅप मेसेज अजूनही त्यांच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगमध्ये परबांचा हात, माझा नाही – देशमुख

परंतु पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रॅकेट चालवत असल्याच्या आरोपांना उत्तर देताना अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खापर फोडलं. अनिल परब पोलीस अधिकाऱ्यांची यादी घेऊन त्यांच्याकडे यायचे. त्या यादीत शिवसेनेच्या आमदारांच्या आवडत्या अधिकाऱ्यांची नावे असायची. त्यांची बदली आणि पोस्टिंगसाठी ते शिफारस करायचे. त्या यादीवर कोणाचीही स्वाक्षरी नव्हती, असंही देशमुख यांनी ईडीने केलेल्या चौकशीत सांगितले होते.


हेही वाचाः पोलीस बदल्यांची यादी अनिल परबांकडून येत होती, देशमुखांच्या जबाबावर आता परबांचं स्पष्टीकरण

First Published on: February 3, 2022 3:11 PM
Exit mobile version