तीन फैरी फायरिंग करुन शहीद पोलिसांना मानवंदना

तीन फैरी फायरिंग करुन शहीद पोलिसांना मानवंदना

पोलीस स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी (दि.२१) नाशिक पोलीस आयुक्तालयातील पोलीस कवायत मैदानावर शहीद पोलिसांना मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली. शोकपरेडमधील पोलीस जवानांतर्फे दोन मिनीट मौन पाळून रायफलच्या तीन फैरी फायरिंग करुन सलामी देण्यात आली. परडमध्ये ६६ पोलीस अधिकारी व १३३ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. परेडचे संचलन राखीव पोलीस निरीक्षक सोपान देवरे यांनी केले.

चिनी आक्रमणाच्या वेळी शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ ऑक्टोबर रोजी या पोलिस हुतात्मा दिनाचे आयोजन केले जाते. २०२०-२१ मधील शहीद पोलीस बांधवांच्या स्मृतिपित्यर्थ नाशिक पोलीस आयुक्तालयात पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमाचे पोलीस कवायत मैदान येथे आयोजन करण्यात आले होते. वर्षभरात देशभरात आर्मी जवान, पॅरामिलिटरी फोर्स, पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार असे एकूण ३७७ जण शहीद झाले आहेत. तसेच, कोरोना काळात नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलातील २६ पोलीस अधिकारी व अंमलदार शहीद झाले आहेत. त्यांना पुष्पांजली अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. सुरुवातीला कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी हुतात्मा स्मारकात शहीद पोलिसांना पुष्पांजली अर्पण करत मानवंदना दिली. यावेळी शहीद पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नावांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर मंत्री भुसे यांच्या हस्ते शहीद पोलीस अंमलदार निवृत्ती बांगारे यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीचा ५० लाखांचा धनादेश देण्यात आला.

मंत्री दादा भुसे म्हणाले, देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन आयोजित केला जातो. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमध्ये चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रिय राखीव दलाच्या १० जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. या जवानांच्या स्मरणार्थ हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय म्हणाले, जे पोलीस हुतात्मा झाले त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने कोरोना योद्धा म्हणून ५० लाख रुपयांची मदत मंत्र्यांच्या हस्ते शहीद पोलिसांच्या कुटुंबियांकडे सुपुर्द करण्यात आली.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलीस अधीक्षक सचिन, वन विभागचे उप वनसंरक्षक अधिकारी पंकज गर्ग, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे उपसंचालक गौरव सिंग, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, विजय खरात आदी उपस्थित होते.

First Published on: October 21, 2021 3:25 PM
Exit mobile version