थाळीनादवरून पंतप्रधान ‘सामना’च्या टार्गेटवर!

थाळीनादवरून पंतप्रधान ‘सामना’च्या टार्गेटवर!

रविवारी देशवासियांनी दिवसभर जनता कर्फ्यू पाळला असला, तरी संध्याकाळी ५ वाजता घराच्या बाल्कनीत येऊन थाळी, टाळी, शंख, घंटीनाद करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन काहींनी भलत्याच अर्थाने घेतलं आणि अक्षरश: रस्त्यावर उतरून मोर्चे काढत, ढोल-ताशे बडवत सेलिब्रेशन केलं. वास्तविक या कृतीतून करोनाग्रस्तांना वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस अशा सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हाच एकमेव उद्देश होता. मात्र, त्याचे उलट परिणाम दिसून आले. त्यावरून काल सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीटरवरून टीका केली असताना आता सामनाच्या संपादकीयामधून देखील पंतप्रधानांच्या या आवाहनाचा समाचार घेण्यात आला आहे.

भिती असेल, तरच गांभीर्य राहातं…

‘मुंबई-पुण्यात लॉकडाऊन असूनही करोनाबाधितांची संख्या वाढते आहे. पंतप्रधान मोदींची चिंता व्यक्त केली आहे. काय तर लॉकडाऊनला जनता गंभीरपणे घेताना दिसत नाही ही चिंतेची बाब आहे. चिंतेची बाब आहेच. कारण लोकांच्या मनात भिती असेल, तरच लोकं गोष्टी गांभीर्याने घेतात. लोकांच्या मनात भितीचा व्हायरस घुसत असतानाच पंतप्रधानांनी थाळीनादाचं आवाहन केलं. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. लोकांच्या झुंडीच्या झुंडी नाचत उड्या मारत रस्त्यावर उतरल्या आणि या प्रकाराला उत्सवी स्वरूप प्राप्त झालं’, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

चिंतेचं वातावरण नसेल, तर चिंतेला अर्थ काय?

याशिवाय, ‘देशभरात थाळी-संगीतासाठी झालेली गर्दी आणि उत्सवी वाातवरण पाहून इतरांची भिती मेली. करोना वगैरे झूट असल्याचा कीडा त्यांच्या डोक्यात वळवळायला लागला. मुंबईच्या मुलुंड टोलनाक्यावर सोमवारी वाहनांची तोबा गर्दी  झाली. ही गर्दी कुठे निघाली आहे? लोकांना चिंता, गांभीर्य वाटावं असं वातावरण नसेल, तर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या चिंतेचा मतलब काय?’ असा सवाल देखील या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

केंद्र आणि राज्यात समन्वय हवा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाने फिरवलेल्या निर्णयावर देखील अग्रलेखात बोट ठेवण्यात आलं आहे. ‘अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली लॉकडाऊनचे आदेश दिले. दिल्ली विमानतळ देखील बंद केलं. ते योग्य तेच करत होते. पण लगेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमानतळे चालूच राहतील असं सांगितलं. त्यामुळे पुन्हा गांभीर्याचे १२ वाजले. केंद्र आणि राज्यात समन्वय राहिला नाही, तर करोनाचं तांडव वाढत जाईल’, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

First Published on: March 24, 2020 7:52 AM
Exit mobile version