राजकारण्यांकडून जनतेचा खेळखंडोबा सुरू, संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल

राजकारण्यांकडून जनतेचा खेळखंडोबा सुरू, संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल

राज्यस्तरीय अधिवेशनात स्वराज्य संघटनेचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. पुण्यात स्वराज्य संघटनेचं पहिलं राज्यस्तरिय अधिवेशन पार पडलं. तसेच संभाजीराजेंच्या स्वराज्य भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, मला प्रस्थापित लोकांबाबत विरोध नाहीये. पण जे काही प्रस्थापित लोकं माजलेले आहेत. त्यांच्याबद्दल मला विरोध आहे. पण चूक त्या प्रस्थापित लोकांची नाहीये. तर चूक आपली आहे. कारण आपण त्या सगळ्यांना निवडून देतोय. राज्यातील राजकारण्यांकडून जनतेचा खेळखंडोबा सुरू आहे, असा हल्लाबोल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जनतेशी संवाद साधताना राज्यातील राजकारणांवर निशाणा साधला आहे. माझ्या स्वराज्यातील लोकांना सांगायचं आहे की, जी आपली जनता आहे. जी आपली रयत मतदान करत आहे. पण यांना मला सांगायचं आहे की, आता यापुढे या सर्व गोष्टी चालणार नाहीत. हे आपला खेळ करायला लागलेत. या राजकारण्यांची तीच चर्चा आणि तेच खोटं बोलणं सुरू असतं. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का?, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे.

वेळ प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकरांचं नाव घेतात. तसेच वेळ प्रसंगी महासंतांचं नाव घेतात आणि खेळखंडोबा करून आपल्याला खुळ्यात काढतात. त्यामुळे आजही वेळ गेलेली नाही. या स्वराज्याच्या माध्यमातून आपल्याला जनजागृती करून सामान्य, कष्टकरी आणि शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी आपण बाहेर पडायचं आहे. त्यामुळे हे अधिवेशन त्याच्यासाठीच आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

स्वराज्य म्हणजे काय? स्व म्हणजे तुम्ही (डॉक्टर, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, इतिहासकार, शेतकरी) हे राज्य तुमचं आहे. हे स्वराज्य असचं पुढे चालू ठेवायचं का?, यासाठी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आपण अनेक इतिहासकारांचे विचार सांगतो. पण हे राजकारणातली लोकं हा विचार घेऊन चालतात का, हा एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्वराज्याने पुढकार घेणं महत्त्वाचं आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.


हेही वाचा : गैरसमज दूर होतील; कीर्तिकरांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचा खुलासा


 

First Published on: May 27, 2023 2:51 PM
Exit mobile version