शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी, पुरंदरेंचं पत्र दाखवत संदीप देशपांडेंचा पवारांवर निशाणा

शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी, पुरंदरेंचं पत्र दाखवत संदीप देशपांडेंचा पवारांवर निशाणा

महाराष्ट्रात जेम्स लेन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबतीत चुकीची माहिती देणाऱ्यांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे सुद्धा होते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. तसेच ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत, असं देखील पवारांनी म्हटलं होतं. यालाच प्रत्युत्तर म्हणून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पत्र दाखवत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असं संदीप देशपांडे म्हणाले.

 संदीप देशपांडेंनी प्रसार माध्यमांसमोर आणलं पत्र

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांसमोर हे पत्र आणलं आहे. या पत्रामध्ये १० नोव्हेंबर २००३ मध्ये बाबासाहेब पुरंदरे आणि महाराष्ट्रातील नामवंत इतिहासकार या सर्वांनी मिळून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये महाराष्ट्रातील इतिहास तज्ज्ञांच्या सह्या आहेत. यामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची देखील सही आहे. परंतु या पत्रामध्ये बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेन यांनी लिहिलेल्या आणि त्यानंतर वाद निर्माण झालेल्या पुस्तकावर पब्लिकेशन हाऊसनं बंदी घालावी, अशी मागणी केली होती.

जेम्स लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकात लाखोंचं श्रद्धास्थान असलेल्या शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वादग्रस्त गोष्टी लिहिल्या होत्या. ज्यासंदर्भात कुठलेही पुरावे त्यांनी दिले नाहीत. केवळ कपोलकल्पित गोष्टींवर आधारित अशी ही माहिती असून त्यामध्ये काहीच तथ्य नाही, असं त्या पत्रात नमूद करण्यात आलंय.

संदीप देशपांडे यांनी पत्रातील माहिती माध्यमांसमोर वाचून दाखवली. तसेच त्यांनी राष्ट्रवादीवर देखील टीका केली. हे पत्र स्पष्ट असून ज्यामध्ये शरद पवार हे पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, बाबासाहेबांनी यासंदर्भात कुठेही काहीही म्हटलेलं नाहीये. मात्र, हे पत्र स्वयंस्पष्ट पत्र असून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पत्राची कल्पना १०० टक्के राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. तरीही यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा भाषणामध्ये म्हटलं होतं की, जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली होती. तेव्हापासून जातीजातींमध्ये भांडणं लावण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून केलं जातंय. यापेक्षा ढळढळीत पुरावा राज ठाकरेंच्या वाक्याच्या असू शकत नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले.

शरद पवारांना आव्हान

शरद पवारांनी म्हटलं होतं की, माझ्याकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नाहीये. आता ही माहिती या पत्राच्या माध्यमातून समोर आलेली आहे. हे पत्र प्रसार माध्यमातून त्यांना पोहोचवण्याची विनंती करतो. त्यांना जर वाटेल असेल जर आपली चूक झाली आहे तर मला वाटतं की, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहीजे, असं संदीप देशपांडे म्हणाले.


हेही वाचा : देशाची फाळणी होऊ द्यायची नसेल तर हिंदू सशक्त झाला पाहिजे – चंद्रकांत पाटील


 

First Published on: April 14, 2022 2:56 PM
Exit mobile version