सत्तेच्या महाभारतात संजय घायाळ!

सत्तेच्या महाभारतात संजय घायाळ!

खासदार संजय राऊत

महाभारतातील रणांगणात होणार्‍या महायुद्धाचे कथन धृतराष्ट्राला करणार्‍या संजयचे स्थान खूपच महत्त्वाचे होते. महाराष्ट्रातील सध्याच्या सत्तेच्या महाभारतातील रणसंग्रामातील ‘संजय’ हासुद्धा तितकाच महत्वाचा ठरला आहे. अर्थात, हा संजय फक्त आपल्या दिव्यदृष्टीनेच नव्हे तर आपल्या धारदार वाणीने, संपर्क व्यवस्थेने आणि व्यवस्थापन कौशल्याने गेली तीस वर्षे राज्याच्या राजकारणात प्रत्यक्ष रणांगणावर वावरतो आहे. आता या संजयने अख्खे कुरुक्षेत्र व्यापून टाकले आहे. या आधुनिक महाभारतातल्या संजयची भूमिका वठवणार्‍या साठीच्या उंबरठ्यावरील योद्ध्याचे नाव आहे संजय राजाराम राऊत. शिवसेनेचे नेते, प्रवक्ते, खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ज्या खुबीने आणि कौशल्याने सेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना सत्तेच्या महाभारतात अग्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सारेच अवाक झाले.

या सार्‍याचे प्रचंड दडपण राऊत यांच्या प्रकृतीवरही आले आणि त्यांना वांद्य्राच्या लीलावती रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय ताणतणावाची चर्चा नेते, कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. संजय राऊत 1992 पासून दैनिक ‘सामना’च्या कार्यकारी संपादकपदाची धुरा वाहत आहेत. ज्येष्ठ संपादक अशोक पडबिद्री यांच्याकडून स्वीकारलेली ही जबाबदारी राऊत यांनी मोठ्या खुबीने पार पाडली आहे. बाबरी मशिदीचा ढाचा पडल्यानंतर मुंबईमध्ये उसळलेल्या दंगलीमध्ये शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ने महत्वाची भूमिका बजावली होती.

याच मुखपत्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांना आदेश देत होते. हे आदेश ठाकरेंच्या शब्दातच सैनिकांना पोचवण्याचे आणि धर्मयुद्धाचे वर्णन सेनाप्रमुखांच्या शब्दात जसेच्या तसे करण्याचे काम संजय राऊत यांनी केले. या सगळ्याच्या जोरावर सामना वृत्तपत्रीय खपाचे विक्रम मोडून मोकळा झाला. त्यानंतर ‘सामना’ला देशाच्या राजकारणात विशेष महत्व प्राप्त झाले. त्याची बक्षिशी राऊतांना लागोपाठ तीन वेळा राज्यसभेची खासदारकी मिळाली. त्याचा उपयोग राऊतांनी दिल्ली दरबारात स्वतःचे वजन वाढवण्यासाठी केला.

आपल्या पत्रकारितेआधी वितरण विभागात काम करणार्‍या राऊतांनी आपले राजकीय वितरण इतके चोख केले की, शिवसेनाप्रमुखानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही सेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी याच संजयला सत्तेच्या महाभारतात उतरावे लागले. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत काटेकोरपणे जगणार्‍या राऊत यांनी ‘सामना’ला नेहमीच सर्वोच्च महत्व दिले आहे. हे महत्व इतके मोठे आहे की, त्यांनी मुखपत्राच्या संपादकपदी राहताना केंद्रीय मंत्रिपदाकडेही पाठ फिरवली. त्याचवेळी कुणीही स्पर्धक आपल्या 200 कि. मी. परिघात येणार नाही याची काळजी घेताना कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर न चुकता होतील याची खबरदारीही घेतली.

त्याच वेळी आपल्या लेखणीने कधी सोनियांना तर कधी मोदींना अत्यंत बोचर्‍या शब्दात ठोकणार्‍या राऊतांनी पवारांवर मात्र काकणभर जास्तच प्रेम केले. याच पवारांच्या भरवशावर सेनेला संख्याबळ कमी असताही मुख्यमंत्र्यांचे स्वप्न दाखवले. हे करताना दिवसातून तीन तीन पत्रकार परिषदा, शेकडो फोन, तासनतासाच्या राजकीय चर्चा, मातोश्रीवरचे दीर्घ मंथन, सामनाचे कामकाज, यामुळे स्वतःवर कमालीचा ताण घेतला. राज्यपालांना भेटायला काही तास शिल्लक असताना गेले 15 दिवस छातीतील दुखणे अंगावर काढणार्‍या संजय राऊत यांना वांद्य्राच्या लीलावती रुग्णालयात दाखल व्हावे लागले.

कमालीचे मातृभक्त असणार्‍या राऊत यांच्यासाठी आईचा शब्द ब्रम्हवाक्य आहे. तिच्या आग्रहानंतर संजय यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेतली. तिथे त्यांच्या इसीजीमध्ये बदल झाल्याचे आढळून आल्यावर त्याना लीलावतीच्या 1102 या अतिमहत्वाच्या कक्षात दाखल करण्यात आले. बाहेर सत्तेचे महाभारत कमालीचे रंगतदार स्थितीत पोचल्यावर हा आधुनिक महाभारताचा ‘संजय’ काहीसा घायाळ झाला. त्याचवेळी तो पुन्हा सत्तासमरासाठी उतरावा म्हणून अनेकांनी देवाकडे प्रार्थना केली आहे. संख्याबळ नसताना सर्वोच्च स्थानी झेपावणार्‍या सेनेला आता या आधुनिक संजयची खरीखुरी गरज आहे.

First Published on: November 12, 2019 6:52 AM
Exit mobile version