Sanjay Raut : …तर मोदी, शहांना ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती; राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : …तर मोदी, शहांना ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती; राऊतांचा घणाघात

...तर मोदी, शहांना ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती; राऊतांचा घणाघात

मुंबई : काँग्रेस नसती तर काय झाले असते? असे एक पुस्तक आज भाजपाकडून प्रकाशित करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाच्या प्रकाशाची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु, याबाबत आज (ता. 17 मार्च) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. जर काँग्रेस नसती तर नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती, असे म्हणत राऊतांनी भाजपावर टीकास्त्र डागले आहे. (Sanjay Raut’s criticism of Narendra Modi, Amit Shah saying if there was no Congress)

हेही वाचा… Sanjay Raut : गॅरंटी तेच नाही तर आम्हालाही देता येते, राऊतांच्या भाजपाला टोला

यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, जर या देशात काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असतील हे सगळे काँग्रेसच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांसोबत लढा दिला. काही मतभेद असतील, परंतु, त्यांनी काँग्रेसला प्रेरित होऊन हा लढा दिला. काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसते. हा देश बुवा, महाराज, जादूटोणा, तंत्रमंत्रवाल्यांच्या हातात गेला असता जो आज गेलेला आहे, असा टोला लगावला.

तर, काँग्रेसमुळे देशाला लाल बहादूर शास्त्री मिळाले, राजीव गांधी, इंदिरा गांधी मिळाल्या. काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते. जे मोदी-शाह यांना बाप जन्मात कधी जमणार नाही. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे करून देशाच्या फाळणीचा बदला घेतला. काँग्रेस नसती तर हे झाले नसते. त्यामुळे भाजपाने काँग्रेसचे ऋण व्यक्त केले पाहिजे. काँग्रेसमुळे आज तुम्ही स्वातंत्र्याची सूर्यकिरणे पाहताय, असेही संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी भाजपाच्या काँग्रेस नसती या पुस्तकावर सडकून टीका केली आहे. ज्यामुळे आता भाजपाकडून राऊतांच्या या टीकेला काय उत्तर देण्यात , येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

First Published on: March 17, 2024 11:51 AM
Exit mobile version