लोकशाहीला मालक निर्माण झाले आहेत, संजय राऊतांचा भाजपला टोला

लोकशाहीला मालक निर्माण झाले आहेत, संजय राऊतांचा भाजपला टोला

राज्यसभेच्या निवडणुकीत गडबड झाली असेल पण महाविकास आघाडीतील त्यांचे सर्व समर्थक आमदार एकजूट आहेत. शिवसेनेच्या दोन बसेस हॉटेलमधून रवाना झाल्या आहेत. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री विधान भवनच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवसेनेची एकजूट किती आहे, हे आपल्याला संध्याकाळी ८ वाजताच्या दरम्यान कळून येईल. ही लोकशाही आहे, या लोकशाहीला काही मालक निर्माण झालेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

लोकशाहीला मालक निर्माण झालेत

संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय यंत्रणांच्या दबावाबाबत जे काही सांगितलं आहे, त्यामध्ये तथ्य आहे. आमदार आपापल्या पक्षाच्या कॅम्पमध्ये असताना सुद्धा अशाप्रकारे दाब, दबाव आणि धमक्या हे सर्व प्रकार सुरू होते. हे सर्व आमच्यासमोर घडलं आहे. परंतु त्याचा काहीही परिणाम होणार नाही. ही लोकशाही आहे, या लोकशाहीला जरी काही मालक निर्माण झाले असले तरी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण आपण ऐकलं असाल. या सगळ्यांवरती आम्ही मात करू आणि महाराष्ट्र पुढे नेऊ, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये एकजूट

महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष हातात हात घेऊन चालले आहेत. धोका हे सर्व शब्द यावेळी वापरणं योग्य नाहीये. कारण धोका फक्त एकतर्फी असतो का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. शिवसेना आपल्या पहिल्या पसंतीची चार मतं आम्हाला द्यावीत, असं सांगितलं जातंय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, राऊत म्हणाले की, हे सर्व मतदान संपल्यानंतर आम्ही सांगू. आता काय ठरलंय किंवा काय नाय ठरलंय हे तुमच्यासमोर आम्ही का सांगावं?, असं राऊत म्हणाले.

तिन्ही पक्षाचे आघाडीचे उमेदवार हे निवडून येतील

विधानपरिषदेची आजची निवडणूक नक्कीच महत्त्वाची आहे. तिन्ही पक्षाचे आघाडीचे उमेदवार हे निवडून येतील. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते मुल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं व्यवस्थित संवाद सुरू आहे.


हेही वाचा : आमदारांवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो, रोहित पवारांची प्रतिक्रिया…


 

First Published on: June 20, 2022 10:05 AM
Exit mobile version