पडलेल्या सरकारला कसा टेकू लावायचा हे दादांना माहित आहे

पडलेल्या सरकारला कसा टेकू लावायचा हे दादांना माहित आहे

‘अजित दादांना हे ही माहित आहे पडलेल्या सरकारला कसा टेकू लावायचा. पहाटे सरकार बनल आणि दिवसा कोसळल. त्यानंतर पुन्हा दुपारनंतर एक नवं सरकार स्थापन झालं. त्यामुळे अजित पवार हे संपूर्ण ऑपरेशनमध्ये एक सर्जन आहेत’, असे म्हणत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना सडेतोड उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी सरकार पडेल आणि कसे पडेल हे अजित पवारांना चांगलच माहिती आहे, यावर राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रतिउत्तर दिले आहे.

‘बेळगाव दौरा हा फक्त दौरा नव्हता, महाराष्ट्र एकीकरण समिती फार महत्त्वाची संघटना आहे. एकीकरण समितिचा उमेदवार शुभम शेळके हा लोकसभा लढवत आहे आणि त्याला पाठिंबा देणे हे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचे कर्तव्य आहे. इथे मतभेद असले तरी चालतील. मात्र, तिथे नसायला हवेत, शिवसेना काँग्रेस भाजप राष्ट्रवादी प्रत्येक मराठी माणसाने तिथे गेले पाहिजे. तिथे लोकांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळतोय. यावेळेस महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार चांगली मुसंडी मारतील’, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

मराठी प्रेम काय ते आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही

‘देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या वर टीका केल्याने मला वाईट वाटले नाही. मात्र, ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांच्या उपस्थितीत विधानसभेत बेळगाव-कारवार यांना पाठिंबा देण्याचे ठराव केले आहेत. पाठिंब्याची गरज होती त्या वेळी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं बेळगावात येऊन मराठी माणसाला पाठिंबा द्या, पण फडणवीस यांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्रातली जनता त्याची नोंद ठेवते आहे. आम्हाला मराठी प्रेमासाठी कोणी ज्ञानामृत पाजण्याची गरज नाही आणि ज्या बेळगाव साठी १९६७ साठी आंदोलन करून शिवसेनेने ६७ हुतात्मे दिलेली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना तीन वर्षाचा तुरुंगवास बेळगावसाठी भोगावा लागला. त्या शिवसेनेचे आम्ही पाईक आहोत. त्यामुळे आमचे मराठी प्रेम काय आहे हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही, खरं म्हणजे तुमच्या मराठी प्रेमाविषयी या विषयाने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे’.

मुख्यमंत्री फार सौम्य आहेत

‘मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोविडीची परिस्थिती गंभीर आह.  मुख्यमंत्री फार सौम्य आहेत अजूनही मला असे वाटते, मुख्यमंत्री माणुसकी दया दाखवत आहेत. लोकांच्या प्रश्नासंदर्भात ते अस्वस्थ आहेत. पण, लोकांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे’.


हेही वाचा – कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी बंधनकारक, वर्धा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय


 

First Published on: April 16, 2021 11:05 AM
Exit mobile version