Sanjay Raut : शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही, पण…; उमेदवारांबाबत राऊतांचे मोठे स्पष्टीकरण

Sanjay Raut : शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही, पण…; उमेदवारांबाबत राऊतांचे मोठे स्पष्टीकरण

उमेदवारांच्या नावांबाबत संजय राऊतांचे स्पष्टीकरण

मुंबई : लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर होऊन 10 दिवस झाले आहेत. पण अद्यापही शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून कोणत्या उमेदवाराला, कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. पण याबाबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेनेत यादी जाहीर करण्याची प्रथा परंपरा नाही, पण मीडियाच्या सोयीसाठी उद्या आम्ही यादी जाहीर करू, अशी माहिती खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे. आज (ता. 26 मार्च) प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार राऊत यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही सडकून टीका केली. (Sanjay Raut explanation regarding announcement names of Lok Sabha candidates)

हेही वाचा… Sanjay Raut : सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे उतरणार बारामतीच्या रिंगणात, राऊतांची माहिती

प्रसार माध्यमांसमोर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ”शिवसेनेत यादी जाहीर करण्याची प्रथा परंपरा नाही. आमच्या पक्षात संभाव्य उमेदवारांना काम करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बहुतांश उमेदवारांना काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र आता आपण महाविकास आघाडीत असल्यामुळे तसेच मीडियाच्या सोयीसाठी उद्या आम्ही यादी जाहीर करू. उद्धव ठाकरेंनी सर्व उमेदवार निश्चित केलेले आहेत. काँग्रेसने दिल्लीतून बरेचसे उमेदवार जाहीर केले आहेत. रविवारी शरद पवार व जयंत पाटील मातोश्रीवर आले होते. राष्ट्रवादीचीही पूर्ण तयारी झाली असल्याचे त्यांच्याकडून समजले. महाविकास आघाडीत एखाद्या जागेवरून मतभेत, संघर्ष तणावाचे चित्र अजिबात नाही.

तसेच, सत्ताधाऱ्यांच्या जागावाटपाबाबत भाष्य करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महायुतीतील भाजपाच्या सर्व जागा निश्चित होऊन जाहीर झालेल्या आहेत. मांडलिक, आश्रितांना मागण्याचा अधिकार व हक्क नसतो. गुलामांच्या तोंडावर कायम तुकडे फेकले जातात. आमचे जागावाटप आम्ही महाराष्ट्रातच करतो. मातोश्रीवर बसतो, सिल्व्हर ओकवर बसतो. आम्हाला उठसूट दिल्लीला जाऊन लॉनवर रुमाल टाकून बसावे लागत नाही, असा टोला राऊतांनी लगावला.

याचवेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत सुरू असलेल्या चर्चेबाबतही भाष्य केले. वंचित बहुजन आघाडी हा आघाडीतला महत्त्वाचा व सन्माननीय घटकपक्ष आहे. आंबेडकर सगळ्यांचे नेते आहेत. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. महाआघाडीत जागावाटप करताना थोडेस मागेपुढे होते. आम्ही त्यांना चार जागा देऊ शकतो. त्यात अकोला व इतर तीन जागा आहेत. मात्र त्यांच्या बोलण्यावरून असे वाटते की त्यांना चार जागांचा प्रस्ताव मान्य नाही. तरिही आम्ही बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून निश्चित मार्ग काढू, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

तर, आंबेडकरांसोबत आमची चर्चेची तयारी आहे. आम्हाला वंचित बहुजन आघाडी महाविकासआघाडी सोबत हवी आहे. तसेच महाविकास आघाडीसोबत आपण राहायला हवे ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची देखील आहे. त्याबाबतीत त्यांनी कोणताही संकोच ठेवलेला नाही. महाराष्ट्रात आपल्याला एकत्र काम करायचे आहे आणि हुकुमशाही संपवायची आहे हाच आमचा प्लान आहे, असे खासदार संजय राऊत यांच्याकडून यावेळी प्रसार माध्यमांसमोर सांगण्यात आले.

First Published on: March 26, 2024 6:07 PM
Exit mobile version