शिवसेनेची गुढी पुन्हा घरांघरांवर उभारणार, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

शिवसेनेची गुढी पुन्हा घरांघरांवर उभारणार, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

संग्रहित छायाचित्र

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपवर निशाणा साधत असतात. आज (ता. २२ मार्च) देखील गुढीपाडव्याच्या शुभदिनी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावर परखड शब्दात टीका केली आहे. मोगलाई पद्धतीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले. तर राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या आणि गुडीपाडव्याच्या शुभेच्छा दाखल दिला आहेत.

यावेळी प्रसार माध्यमांसमोर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचा उल्लेख हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी म्हणून केला जातो. त्या शिवसेनेचं गुढीवर केंद्र सरकारने मोगलाई पद्धतीने आक्रमण केल्याने या राज्यातील जनता दुःखी झाली आहे. पण नवीन वर्षामध्ये शिवसेनेची स्वाभिमानाची ही गुढी पुन्हा एकदा घराघरांवर फडकावल्याशिवाय राहणार नाही.

तर सत्ताधाऱ्यांवर टीका करत ते म्हणाले की, या देशात एखादा सामान्य माणूस सुद्धा पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. जर आपल्याकडे बहुमत येणार असेल, तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता. शेवटी आकड्यांचा खेळ आहे आणि बहुमत हे नेहमी चंचल असते. आज आमच्याकडे असेल तर उद्या दुसऱ्या कोणाकडे असेल. त्यामुळे बहुमताच्या खेळावर कोणी अवलंबून राहू नये, असे बोलत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

दरम्यान, नेहमीच संजय राऊत हे त्यांच्या भाषणांमधून आणि सोशल मिडीयाच्या पोस्टच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर आणि विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत असतात. त्यामुळे त्यांच्या निशाणा साधण्याने सत्ताधारी देखील वैतागलेले दिसून येतात. त्यांच्या अशा निशाणा साधण्याच्या सवयीने आणि परखड मत व्यक्त करण्याच्या सवयीमुळेच आज शिवसेनेत फुट पडली असल्याचे शिवसेनेतील (शिंदे गट) आमदार आणि नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत असते. नुकतेच, संजय राऊत यांच्यावर एका अत्याचाराच्या प्रकरणातील पीडित मुलीचा फोटो ट्वीटवर शेअर केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


हेही वाचा – गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत मुख्यमंत्र्यांची राजकीय घोषणाबाजी, म्हणाले धाडसी निर्णय घेणारं…

First Published on: March 22, 2023 11:11 AM
Exit mobile version