शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत? व्यासपीठावर खुर्ची ठेवली राखीव

शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत? व्यासपीठावर खुर्ची ठेवली राखीव

मुंबई – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज गोरेगावच्या नेस्को मैदानामध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला शेकडो शिवसैनिक दाखल झाले आहेत. तसंच, अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले संजय राऊत यांच्यासाठीही खास राखीव खुर्ची या कार्यक्रमात ठेवण्यात आली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार की नाही यावर अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. हे प्रकऱण आता उच्च न्यायालयात गेलं आहे. दुसरीकडे बीकेसीतील एका मैदानावर एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे, मात्र, दुसऱ्या मैदानावर उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा याकरता पालिकेने परवानगी द्यावी, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.


त्यामुळे शिवतीर्थावर दसऱ्यादिवशी कोण गरजणार याकडे संपूर्ण मुंबईकरांसह राज्याचं लक्ष लागलेलं आहे. असं असतानाच आज शिवसेनेच्या गटनेत्यांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात लीलाधर डाकेंसह अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. अनेक नेत्यांना व्यासपीठावर जागा मिळाली आहे. तर, संजय राऊत यांच्यासाठीही व्यासपीठावर खूर्ची राखीव ठेवण्यात आली आहे.

First Published on: September 21, 2022 7:24 PM
Exit mobile version