Sanjay Raut : वंचितला दिलेला चार जागांचा प्रस्ताव कायम – संजय राऊत

Sanjay Raut : वंचितला दिलेला चार जागांचा प्रस्ताव कायम – संजय राऊत

मुंबई : महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना आम्ही चार जागांचा जो प्रस्ताव दिला आहे, तोच प्रस्ताव कायम आहे, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीच्या 17 जागांच्या प्रस्तावाला एकप्रकारे पूर्णविराम दिला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तसेच, वंचित आणि मविआत धूसपूस सुरूच आहे. अशातच संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर चार जागांचा प्रस्ताव स्वीकारणार का? हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे. (sanjay raut mva vanchit bahujan aghadi prakash ambedkar)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीतल शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी तयारी असल्याची माहिती देतानाच वंचित बहुजन आघाडीला मविआने दिलेल्या प्रस्तावावरही त्यांनी माहिती दिली. त्यानुसार, “वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये आहेत का? असा प्रश्न तुमचा नेहमी असतो. तर आमचं उत्तर असंय की, ते महाविकास आघाडीत आहेत. वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. वंचितसोबत अनेकदा आमची चर्चा झाली असून, ते स्वत: हजर असायचे. कालपर्यंत आमची चर्चा सुरू होती. आजही चर्चा सुरूच राहिल. महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना आम्ही चार जागांचा जो प्रस्ताव दिला आहे, तोच प्रस्ताव कायम आहे. याबाबत आमच्या त्यांच्यासोबत चर्चा सातत्याने सुरू आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

शिवाय, “आम्हाला खात्री आहे की, या देशात आणि महाराष्ट्रात ईदी अमीनचे हुकूमशाहीचे राज्य सुरू आहे. संविधानाच गिळायला पाहत आहेत. ईदी अमीन हा नरभक्षक होता. तशीच संविधानभक्षक लोकं या देशावर राज्य करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान गिळण्याचा प्रयत्न होतो आहे. अशावेळी आम्ही महाराष्ट्रातील तिन्ही प्रमुख पक्ष आणि देशात इंडिया आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर हे संविधानाच्या रक्षणासाठी ठाम उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही सकारात्मक आहोत. आम्हाला प्रकाश आंबेडकरांची विचारधारा, स्वभाव, संघर्ष, संघटनात्म कौशल्य माहीत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे परखडपणे बोलतात. पण त्यामध्ये समजाचे आणि राज्याचे हीत असते. पण परखडपणा त्यांचा स्वभाव असून तिच त्यांची ताकद आहे. आम्ही वारंवार त्यांची संवाद साधत आहोत”, असेही संजय राऊत म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटाची आज उमेदवार यादी जाहीर होणार

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, महायुतीत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने महाराष्ट्रातील काही लोकसभेच्या जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. अशातच आज महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत स्वत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार आज दिवसभरात कधीही शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल, असे संजय राऊत म्हणाले.

“सोमवारी मातोश्रीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या पुढच्या रणनितीबाबत त्यांच्यात चर्चा झाली. तीन पक्षांच्या सभ, प्रचार यंत्रणा या एकत्र पद्धतीने कशाप्रकारे राबवायच्या याबाबत चर्चा झाली. उमेदवारांच्या घोषणा एकत्रित करता येतील का, अशी चर्चा झाली. शरद पवारांसोबत दररोज सकाळी चर्चा होत असते. शिवसेनेची पहिली यादी तयार आहे. आज दिवसभरात ही यादी प्रसिद्धीस येईल. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपलं जागावाटप जवळपास पूर्ण केले आहे”, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.


हेही वाचा – JITENDRA AWHAD : हा तमाम अस्पृश्यांच्या अस्मितेचा अपमान, आव्हाडांचा सातपुतेंवर निशाणा

First Published on: March 26, 2024 11:00 AM
Exit mobile version