‘या’ जाहिरातीवरून संजय राऊत भडकले; म्हणाले, “आसामचे मुख्यमंत्री आमच्या…”

‘या’ जाहिरातीवरून संजय राऊत भडकले; म्हणाले, “आसामचे मुख्यमंत्री आमच्या…”

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर होय. पण आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद आणखीनच वाढू लागलाय. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी केला आहे. एवढंच नाही तर आसाम पर्यटन विभागानं यासंदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे. याविरोधात आता शिवसेनेचे नेते संजय राऊत हे चांगलेच कडाडले आहेत.

याविरोधात संजय राऊत यांनी आसाम सरकारच्या दाव्यावर जोरदार टीका केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “आसाम राज्यावर आपल्या मुख्यंमत्र्यांचे फार प्रेम आहे. कामाख्या देवी आणि इतर काही प्रकरणे मध्यंतरी झाली. त्यामुळे आसामच्या कृतीवर आमचे मुख्यमंत्री आता काय बोलतात, हे पाहावे लागेल. हा पोरकटपणा चालला आहे. गुजरात आमच्या उद्योगांवर आक्रमण करत आहेच. आता आसामचे मुख्यमंत्री आमच्या देवधर्मावर आक्रमण करु लागले आहेत”, अशी टिका करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरलंय.

काय आहे हा वाद ?
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारच्या पर्यटन विभागाकडून संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये “भारतातील सहावं ज्योतिर्लिंग असलेल्या, कामरुप डाकिनी पर्वत, आसाम आपलं स्वागत आहे”, असा आशय असणारी जाहिरात आहे. याच जाहिरातीमध्ये विविध ज्योतिर्लिंग स्थळांची यादी देखील देण्यात आली आहे. यात भीमाशंकरच्या नावापुढे स्थळाचा उल्लेख ‘डाकिनी’मधील भीमाशंकर असा करण्यात आला आहे. याशिवाय जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा यांचा फोटोही आहे.

आसाम सरकारच्या या अजब दाव्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येतेय. शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या मंदिराबाबत आम्हाला आदर आहे. मात्र उद्योगाप्रमाणे मंदिरे पण दुसरा राज्यामध्ये घेऊन जात आहेत का? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्राला डिवचण्यासाठी वाद करू नका.”

First Published on: February 15, 2023 9:25 AM
Exit mobile version