Sanjay Raut : हिंदुत्वाचे तुम्ही काय दिवे लावले? राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल

Sanjay Raut : हिंदुत्वाचे तुम्ही काय दिवे लावले? राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल

हिंदुत्वाचे तुम्ही काय दिवे लावले? राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागील आठवड्यात प्रचार गीत प्रसिद्ध केले. या प्रचार गीतात त्यांनी ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ असे दोन शब्द वापरले आहेत. पण या दोन्ही शब्दांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला हे शब्द गाण्यातून हटविण्याचे आदेश दिले आहेत. पण आदेशाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून नकार देण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तर त्यांनी भाजपावरही सडकून टीका केली आहे. (Sanjay Raut question Devendra Fadnavis on issue of Hindutva)

आज सोमवारी (ता. 22 एप्रिल) प्रसार माध्यमांसमोर संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्यांकांबाबत केलेल्या विधानाची दखल निवडणूक आयोगाने केली किंवा नाही, हे माहीत नाही. पण आमच्या पक्षाच्या प्रचार गीतात जय भवानी आणि हिंदू धर्म हे शब्द आल्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला. त्या शब्दांवर बंदी घालण्यात येत आहे. भवानी माता ही छत्रपती शिवरायांची कुळदेवी आहे, त्यावर यांना आक्षेप आहे, पण पंतप्रधान मोदी यांचा हात माता-भगिणींच्या मंगळसुत्रापर्यंत जात आहे, ते निवडणूक आयोगाला दिसत नाही. कारण निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा आहे.

हेही वाचा… Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा राऊतांनी घेतला समाचार, म्हणाले…

आम्ही आमच्या गाण्यामध्ये हे शब्द घेतले तरी त्यांना चालत नाही. पण दुसरीकडे मात्र, ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांनी प्रचारगीतात जय भवानी शब्द तरी का आणावा? असा प्रश्न उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित करत आहेत. तर त्यांना सांगा की, त्यांना आमचे जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव चालत नाही. मात्र, हर घर मोदी, नमो नमो चालते, असा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधान जे काही बोलले त्याकडे निवडणूक आयोग लक्ष देणार नाही. दिल्लीमधील निर्वाचन आयोग जे आहे, त्याचं नाव बदलून भाजप निर्वाचन आयोग केले पाहिजे, असा टोलाही राऊतांकडून लगावण्यात आला आहे.

तुमचे नमो-ढमो चालते पण…

महाराष्ट्रामध्ये जय भवानी हा शब्द किंवा हर हर महादेव या घोषणा पिढ्यानपिढ्या दिल्या जातात. त्यावर आत्तापर्यंत कोणीही बंदी आणली नव्हती, काँग्रेसच्या राज्यातही असे कधी घडले नव्हते. तुमचे घर घर मोदी चालते, पण हर हर महादेव, जय भवानी चालत नाही. तुमचे नमो-ढमो चालते पण हिंदू धर्मातील एक शब्द चालत नाही. कसले तुमचे सरकार, बकवास हिंदुत्वावादी सरकार. तुमचे हिंदुत्व व्यापारी आणि नकली हिंदुत्व आहे. तुम्ही हिंदुत्वाचे काय दिवे लावलेत? असा खोचक प्रश्नही यावेळी राऊतांनी उपस्थित करत भाजपा सरकारवर हल्लाबोल केला.

हेही वाचा… Uday Samant : प्रचारसभेवेळी मंत्री उदय सामंतांची गाडी फोडली, अज्ञाताचा शोध सुरू


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 22, 2024 12:18 PM
Exit mobile version