अजित पवार फडणवीसांसोबत शपथ घ्यायला गेले त्याची माहिती होती; संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा

अजित पवार फडणवीसांसोबत शपथ घ्यायला गेले त्याची माहिती होती; संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा

अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करायला मी पाठवलं नव्हतं. त्यात दुसऱ्या काही गोष्टी आहेत, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. त्यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. अजित पवार फडणवीस यांच्यासोबत शपथ घ्यायला गेले याची माहिती होती, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. ते नाशिक येथे माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार हे सांगत आहेत तर ते खरं आहे. त्यावेळेला भाजप सरकार स्थापन करण्यासाठी एवढी उत्तेजित झाली होती. त्यामुळे त्यांना कोणाबरोबरही महाराष्ट्रा सत्ता स्थापन करायचीच होती. याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, हे फोडा, अजित पवारांना गाठा, आमच्या लोकांना गाठा, हा त्यांचा फार मोठा उपक्रम त्या काळात सुरु होता. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला ऑफर होती. त्याची बोलणी कुठून काय सुरु होती, याविषयी मलाही माहिती आहे. त्यासंदर्भात तेही आमच्याशी बोलले होते. त्या काळामध्ये आम्ही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नव्हतो. आमच्याकडे त्या काळामध्ये गुप्त काही नव्हतं. कोण कोणाशी बोलतंय? कोण कोणाला सांगतंय? कोण कोणाला कुठे भेटतोय? आणि कोण कोणाला भेटायला चाललं आहे याविषयी आमच्यामध्ये त्या काळात पारदर्शकता होती. हे बहूतेक भाजपला तेव्हा माहित नव्हतं. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचं सरकार येऊ शकलं नाही.

किंबहुना अजित पवार शपथ घ्यायला गेले त्यातसुद्धा पारदर्शकता होती. पारदर्शकता होती आमच्यात. पारदर्शकता होती आमच्याकडे म्हणून संध्याकाळपर्यंत आमदार परत आले आणि अजितदादाही आले, असं संजय राऊत म्हणाले.

राजकारणामध्ये पारदर्शकता असायला पाहिजे. इतकी मोठी घडामोड घडत असताना कोण काय करतंय आणि उद्या काय होणार आहे, संध्याकाळी काय होणार? आपण महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करायला चालला होतो, कुठे कोणताही एक दगड आडवा येऊ नये ते कसे काढता येईल ते आम्ही काढत राहिलो. आमच्याकडे त्या काळातही जेसीबी चांगला होता, असं संजय राऊत यांनी सांगितलं.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींसोबत भाजप-राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेसाठी चर्चा, शरद पवारांनीच दिली माहिती


 

First Published on: December 30, 2021 10:48 AM
Exit mobile version