शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीत काहीही राजकारण नाही – संजय राऊत

शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीत काहीही राजकारण नाही – संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज दिल्लीत तासभर चर्चा झाली. दरम्यान, या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे खासादार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीत काहीही राजकारण नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटत असतील तर त्यात राजकारण कशाला काढता? महाराष्ट्रातील विषय असू शकतात. विशेषत: सहकार क्षेत्राच्या संदर्भातले विषय, कृषीविषयक विषय हे देशांसंदर्भातील आहेत. शरद पवार अशा विषयांवर पंतप्रधानांना अधूनमधून भेट असतात अशी माझी माहिती आहे. असे काही विषय घेऊन शरद पवार भेटत असतात, असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी आज काही माझी शरद पवार यांच्यासोबत भेट झाली नाही. मला यात कोणत्याही प्रकारचं राजकारण वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले. पंतप्रधानांना या देशात कोणी भेटू शकत नाही का? भेटल्यावर राजकारणच असू शकतं का? अजिबात नाही. यापेक्षाही वेगळे असू शकतात, असं देखील राऊत म्हणाले.

सहकारी कारखान्यावर ईडीच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. सरकारमधील सहभागी लोकांना टार्गेट केल जात आहे. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाई झाल्याचं मी माध्यमातून वाचत आहे, असं राऊत म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पवार-फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची मला माहिती नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

First Published on: July 17, 2021 4:39 PM
Exit mobile version