घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रSanjay Raut : छत्रपती शाहूंच्या पराभवासाठी पंतप्रधान कोल्हापुरात, राऊतांचा भाजपावर हल्ला

Sanjay Raut : छत्रपती शाहूंच्या पराभवासाठी पंतप्रधान कोल्हापुरात, राऊतांचा भाजपावर हल्ला

Subscribe

कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची निवड बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती. पण शाहूंच्या विरोधात प्रचार करून मोदी आणि भाजपा कोल्हापुरच्या गादीचा अपमान करत असल्याची टीका राऊतांकडून करण्यात आली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शुक्रवारी (ता. 27 मार्च) महायुतीचे कोल्हापुरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात येणार आहेत. कोल्हापुरात मोदींची जाहीर प्रचार सभा होणार असून या सभेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. याच मुद्द्यावरुन आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर हल्ला चढवला आहे. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची निवड बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती. पण शाहूंच्या विरोधात प्रचार करून मोदी आणि भाजपा कोल्हापुरच्या गादीचा अपमान करत असल्याची टीका राऊतांकडून करण्यात आली आहे. (Sanjay Raut slams BJP as PM Narendra comes Kolhapur to campaign against Shahu Chhatrapati )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील प्रचार सभेवर खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दलित, शोषित, पीडित यांना जीवनात ताकद देण्याचे काम शाहू महाराजांनी केले. ज्या शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिला, जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्या शाहूंचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत हे ऐकून धक्का बसला नाही, तर आश्चर्य वाटले, अशी टीका राऊतांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Abhijit Patil : सध्या कर्ज फेडणे अशक्य, पण…; कारखान्याच्या कारवाईवर अभिजित पाटलांकडून भाष्य

तर, श्रीमंत शाहू महाराज आणि त्यांच्या आधीचे सर्व त्या गादीचे वारसदार या सर्वांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिले आहे. तरी भाजपाला किंवा त्यांच्या जवळच्या लोकांनी तिथे उमेदवार उभा करणे चूक आहे. कारण छत्रपती शाहूंना बिनविरोध निवडून द्यावे, ही आमची इच्छा होती आणि त्यांनी महाराष्ट्रातील शाहू-फुले-आंबेडकरांच्या परंपरेचा सन्मान करावा. कोल्हापुरची जागा ही शिवसेनेची होती. पण तरी आम्ही शाहू छत्रपती महाराज निवडणूक लढवत असल्याचे म्हटल्यावर ती जागा त्यांच्यासाठी सोडली. पण भाजपा तर्फे पंतप्रधान मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत, पण महाराष्ट्राची जनता हे कधीच विसरणार नाही, असेही यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

शाहूंच्याविरोधात मोदींचा प्रचार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोल्हापुरात शाहूंचा प्रचार करण्यासाठी आले होते, हे कोल्हापुराकरांच्या लक्षात राहणार आहे. ‘मान गादीला, मत मोदीला’ असे असले तरी गादीसमोर मोदी कोणी नाही, असा सणसणीत टोला लगावत खासदार संजय राऊत म्हणाले की, कोल्हापुरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाही, किंवा मोदी बसतात ती गादी नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे आणि भाजपा त्या गादीचा अपमान करत आहे. त्यामुळे “मानही गादीला आणि मतही गादीला” ही कोल्हापुरकरांची घोषणा आहे. हेच कोल्हापुरकरांनी ठरवले आहे. त्यामुळे मोदी आणि त्यांच्या पक्षाचा कोल्हापुरात कार्यक्रम करायचा आहे, हे कोल्हापुरकरांनी ठरवले असल्याचे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -