संजय राऊत म्हणतात, ‘विरोधी पक्ष टिकायला हवा, पण…!’

संजय राऊत म्हणतात, ‘विरोधी पक्ष टिकायला हवा, पण…!’

संजय राऊत, राहुल गांधी

जसजशा मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत आहेत, तसतसा भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब होऊ लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीएमधील घटकपक्ष असणाऱ्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामध्ये त्यांनी एनडीएला मतदान केल्याबद्दल जनतेचे आभार मानतानाच ‘विरोधकांना मतदारांनी का नाकारलं? याचा विचार होणं गरजेचं आहे’, असंही म्हटलं आहे. मुंबईत दादरमध्ये शिवसेना भवनावर आत्तापासूनच जल्लोष सुरू झाला असून कल लक्षात घेऊन भाजप येत्या २६ मे रोजी सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता भाजपप्रणीत एनडीएचा विजय दृष्टीपथात आल्याचं बोललं जात आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

‘पुढच्या ५ वर्षांत मोदी देश पुढे घेऊन जाती. काश्मीर ते कन्याकुमारी असा विजय आम्हाला दिसत आहे. हे यश मिळेल असं आम्हाला माहीत होतं. शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झालं, तेव्हा किमान ४५ जागा जिंकू असा विश्वास तेव्हाच वाटत होता. लोकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे, राफेल, बेरोजगारी, पुलवामा हल्ला या मुद्द्यांना जनतेनं चोख उत्तर दिलं आहे. इव्हीएमवर शंका घेतली गेली, मोदींच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात आले. पण शेवटी मतदार राजा असतो आणि राजा सत्ता कुणाला द्यायची हे ठरवत असतो. देशातल्या जनतेनं त्यांच्या कामावर विश्वास दाखवला आहे हे आता सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. मोदींच्या विरोधात निर्माण केलेलं वातावरण ही एक पोकळी होती’, असं राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.


हेही वाचा – स्मृती इराणी जोमात, राहुल गांधी कोमात

विरोधी पक्ष टिकायला हवा, पण…’

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी विरोधी पक्षांना खोचक सल्ला दिला आहे. ‘विरोधी पक्ष देशात टिकायला हवा. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर जनतेनं विरोधी पक्षांना का नाकारलं? मोदींना, भाजपला, शिवसेनेला स्वीकारलं आणि विरोधी पक्षांना लाथा का घातल्या? त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये सुद्धा दारूण पराभव येण्याची परिस्थिती आहे. लोकांचा हा राग का? हा सगळ्यांसाठी एक संशोधनाचा विषय आहे’, असं राऊत यावेळी म्हणाले.

First Published on: May 23, 2019 1:55 PM
Exit mobile version