सर्वकाही आलबेल, चिंता नसावी; सोनिया-राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर राऊत असं का म्हणाले?

सर्वकाही आलबेल, चिंता नसावी; सोनिया-राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर राऊत असं का म्हणाले?

नवी दिल्ली – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडातील घटकपक्ष ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. सावरकर मुद्द्यावरून मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राहुल ठाकरेंना थेट आव्हान दिलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं उपरोधिक आवाहनही सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होतं. परंतु, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज एक ट्विट केलं आहे. त्यानुसार, या दोन्ही पक्षांत आता कोणतेही वाद नसून सर्व काही आलबेल असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. आज त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केलेल्या ट्वीटची सर्वत्र चर्चा आहे.

संजय राऊतांनी ट्वीट करत म्हटलं की, “श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांची आज भेट झाली.अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी.”


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या परस्पर मतभेद आहेत. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून सावरकर शिवसेनेसाठी दैवत आहेत तर काँग्रेसचे राहुल गांधी सातत्याने सावरकरविरोधी भूमिका जाहीरपणे मांडत असतात. त्यामुळे एकाच आघाडीत असतानाही या दोन्ही पक्षांच्या विविध विचारधारेमुळे दोन्ही पक्षांत मतमतांतरे निर्माण झाली होती.

ठाकरे गटाचं खरं हिंदुत्त्व असेल तर ठाकरे गटाने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं आवाहन शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक आमदारांनी केलं आहे. तसंच, सावरकरांविरोधी तीव्र भूमिका न मांडण्याविषयी राहुल गांधींना समज द्यावी, असे आवाहनही सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटाला करण्यात आले होते.

दरम्यान, ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. तसंच, राहुल गांधी यापुढे सावरकरांविषयी बोलणार नसल्याचं कालच समोर आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा चर्चा झाली असल्याने यातून सकारात्मक तोडगा निघाला असल्याची शक्यता आहे. म्हणूनच सारंकाही आलबेल असून चिंता नसावी असं राऊत म्हणाले आहेत.

First Published on: March 29, 2023 2:23 PM
Exit mobile version