संतोष परब हल्ला प्रकरण: नितेश राणेंना अटकेपासून तूर्तास दिलासा; सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निकालाला देणार आव्हान

संतोष परब हल्ला प्रकरण: नितेश राणेंना अटकेपासून तूर्तास दिलासा; सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निकालाला देणार आव्हान

संतोष परब हल्ला प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर नितेश राणेंना याप्रकरणात अटक होण्याची शक्यता होती. पण आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे, यासाठी १० दिवसांची मुदत नितेश राणेंना उच्च न्यायालयाने दिली आहे. १० दिवसांमध्ये कोणतीही कारवाई करणार नाही, असे आश्वासन सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्यानंतर अटकेपासून दिलेला दिलासा २७ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. यादरम्यान नितेश राणे आता सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करतील.

यापूर्वी संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांचा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आज उच्च न्यायालयात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान देण्यासाठी दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची नितेश राणेंच्या वकिलांची उच्च न्यायालयात मागणी केली आहे. यावर दुपारी आज १२:३० वाजता न्यायमूर्ती सी.वी.भडंग यांच्या समोर सुनावणी पार पडली. यावेळी २७ जानेवारीपर्यंत सिंधुदुर्ग पोलिसांनी कुठलीही कठोर कारवाई करणार नाही, असे आश्वसान उच्च न्यायालयाला दिले. याची नोंद घेत नितेश राणे यांना अटकेपासून उच्च न्यायालयाने जो दिलासा दिला होता, तो २७ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नितेश राणेंना यांना अटकेपासून तूर्तास दिलासा मिळाला आहे.

यादरम्यान आता नितेश राणे उच्च न्यायालयाच्या आजच्या निकाला आव्हान देत अटकपूर्व जामीन सर्वाच्च न्यायालयात दाखल करतील. त्यामुळे संतोष परब हल्लाप्रकरणी आता नितेश राणेंना अटकेपासून दिलासा मिळणार का? याचा निकाला सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी रायगड द्यावा, मग मी ताकद दाखवतो, भास्कर जाधवांचे सुनील तटकरेंना ओपन चॅलेंज


 

First Published on: January 17, 2022 2:06 PM
Exit mobile version