आता सत्यजित तांबेंचे निलबंन?; काॅंग्रेस हायकमांडची सूचना

आता सत्यजित तांबेंचे निलबंन?; काॅंग्रेस हायकमांडची सूचना

मुंबईः काॅंग्रेसचे ज्येष्ठ नते डॉ. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर आता सत्यजित तांबे यांनाही पक्षातून निलंबित करण्याच्या सूचना हायकमांडने केल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघातील बंडखोरी सत्यजित तांबे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

पक्षाकडून होणाऱ्या निलंबनाच्या कारवाईबाबत अद्याप सत्यजित तांबे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. येत्या १८ व १९ जानेवारीला सत्यजित तांबे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

गेल्या आठवआठवड्यात पक्षानं अधिकृत उमेदवारी जाहीर करून आणि एबी फॉर्म देऊनही सुधीर तांबे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. तसेच मुलाच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत सुधीर तांबेंना पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे.

पक्षानं सुधीर तांबे यांना तिकीट दिलं होतं. त्यांनी फॉर्म न भरता पक्षाची फसवणूक केली आहे. स्वत:च्या मुलाला अपक्ष उभे करून ते भाजपचा पाठिंबा घेणार आहेत. ही एक प्रकारची दगाबाजी आहे, असाही संताप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर डॉ. सत्यजित तांबे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी हायकमांडकडे करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेत कॉंंग्रेस हायकमांडने डॉ. सत्यजित तांबे यांचे निलंबन करण्याची सूचना केल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे तांबे पिता-पुत्र अडचणीत आले आहेत.

विधान परिषदेची आचारसंहिता लागू होताच सत्यजित तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू झाली होती. अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी डॉ. सुधीर तांबे हे काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल करतील, असा संदेशही त्यांनी निकटवर्तियांना दिला होता. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत हा अर्ज सादर करण्याचे नियोजन झालेले असताना ऐनवेळी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि सत्यजित तांबे यांच्या आग्रहापुढे सुधीर तांबे यांना सपशेल माघार घ्यावी लागली. त्यामुळे पक्षाने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्याचवेळी सत्यजित तांबे यांच्या निलंबनाची सूचना कॉंग्रेस हायकमांडने केल्याचे सुत्रांनी सांगितले.

First Published on: January 16, 2023 3:37 PM
Exit mobile version