माळशेजघाटासह पावसाळी पर्यटन स्थळावर 144 कलम लागू

माळशेजघाटासह पावसाळी पर्यटन स्थळावर 144 कलम लागू

मुरबाड : टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळशेज घाटासह इतर पर्यटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार टोकावडे पोलीसांनी 144 कलम लावल्याने धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. या धोकादायक ठिकाणी होत असलेल्या अपघातांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून माळशेजसह धबधब्याखालील अनेक ठिकाणी मनाई हुकूम 144 लागू केल्याची माहिती टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस सचिन कुलकर्णी यांनी दिली.

मुरबाड तालुक्यात माळशेजघाट, नानेघाट, थीतबी, सोनावळे गणेशलेणी, पळू ही पावसाळ्यात वनडे पिकनिककरीता मुंबई पासून 150 किमी अंतरावरील ठिकाण असून निसर्गसौंदर्य सहलीची मजा लुटण्याचं एकमेव ठिकाण माळशेज घाट आहे. पावसाळा सुरू झाला की, माळशेज घाटातील निसर्गसौंदर्याची मजा लुटण्यासाठी निसर्गप्रेमी, कुटुंब-वत्सल, हौसे-गवसे नवसे देखील घाटात हजेरी लावतात. सदैव धुक्याची चादर ओढलेला, फेसाळलेल्या धबधब्यात चिंब भिजण्याचा आनंद देणारा माळशेज घाट असून या घाट परिसरातील शेकडो कुटुंबांना रोजगार देण्याची जबाबदारी देखील हा माळशेज घाट पार पाडीत आहे. मात्र सततच्या अपघाताच्या मालिकेने एक प्रकारे शापित, अशा या कायम धोकादायक असलेल्या माळशेज घाटातील निसर्गसौंदर्याची मजा लुटण्यासाठी शनिवार,रविवार सुट्टीच्या दिवशी हा घाट पर्यटकांनी फुलून जातो.

पावसाळा सुरू झाल्याने माळशेजघाटातील धुक्याची चादर ओढलेला आणि धबधब्यात चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी शेकडो अबालवृद्ध येथे हजेरी लावतात, या घाट परिसरातील 33 अदिवासी वाड्या वरील शेकडो नागरिकांना रोजगार मिळतो. परंतु या धोकादायक पर्यटन स्थळावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 30 जून ते 30 ऑगस्टपर्यंत मनाई हुकूम लागू केल्याने पर्यटकांची संख्या रोडावल्याने हातावर उपजीविका असणाऱ्या तेथील वाड्यावरील आदिवासींचा रोजगार हिरावला गेला आहे. याबाबत बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी सांगितले की, हा घाट पावसाळ्यात धोकादायक असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने 144 कलम लागू करण्यात आला आहे.


हेही वाचा : खातेवाटपात राष्ट्रवादीला झुकते माप, पालकमंत्री पदासाठी सरकारमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता


 

First Published on: July 15, 2023 9:05 PM
Exit mobile version