घरताज्या घडामोडीखातेवाटपात राष्ट्रवादीला झुकते माप, पालकमंत्री पदासाठी सरकारमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता

खातेवाटपात राष्ट्रवादीला झुकते माप, पालकमंत्री पदासाठी सरकारमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता

Subscribe

राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात झुकते माप मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता महत्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, रायगड, लातूर या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी आग्रही असून महायुती सरकारमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपमधील सत्तेचे समीकरण बदलले आहे. अजित पवार यांना वित्त खाते देण्यास शिंदे गटाचा विरोध असतानाही त्याला न जुमानता अजित पवार यांना वित्त खाते देऊन मान राखण्यात आला. त्यामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी आहे. अशातच आता खातेवाटपाप्रमाणे जिल्हा पालकमंत्री पदाच्या  फेरनेमणुकीत ‘दादागिरी’ चालेल, अशी भीती शिंदे गट आणि भाजपला वाटू लागली आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्यातून येतात. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळविणे हा पवार यांचा अग्रक्रम राहणार आहे. सध्या पुण्याचे पालकमंत्री पद हे भजापचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाशिकच्या पालकमंत्री पदाचे दावेदार आहेत. भुजबळ यांना नाशिकचे पालकत्व देण्यास शिंदे गटातील आमदारांचा विरोध आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून भाजप भुजबळ यांच्यासाठी शिंदे गटाकडून नाशिकचे पालकमंत्री पद घेऊ शकते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूर जिल्ह्यात वजन आहे. त्यामुळे त्यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद दिले जाऊ शकते. सध्या कोल्हापूरचे पालकमंत्री पद हे शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांच्याकडे आहे. केसरकर यांच्याकडे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मंत्रिमंडळातील सहभागानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. अदिती तटकरे यांच्याकडे रायगड पालकमंत्री पद जाण्याची शक्यता गृहीत धरून शिंदे गटाच्या आमदारांनी त्याला विरोध केला आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे विरोध करण्यात आघाडीवर आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार असल्याचे गृहीत धरून गोगावले यांनी स्वतःला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषित केले आहे.

- Advertisement -

सध्याच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांकडे दोन किंवा तीन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील सहा जिल्हे सांभाळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे जेष्ठ मंत्री असल्याने त्यांना देखील पालकमंत्री पद दिले जाऊ शकते. तसेच अनिल पाटील, धर्मारावबाबा आत्राम, संजय बनसोडे हेही पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदावरून महायुतीत मतभेद होण्याची चिन्हे आहेत.

सध्याचे पालकमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :  नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली
राधाकृष्ण विखे पाटील  : अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार  : चंद्रपूर, गोंदिया,
चंद्रकांत पाटील  : पुणे,
डॉ. विजयकुमार गावित : नंदुरबार,
गिरीश महाजन : धुळे, लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील : बुलढाणा, जळगाव
दादा भुसे : नाशिक,
संजय राठोड : यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे :  सांगली,
संदिपान भुमरे : छत्रपती संभाजीनगर
उदय सामंत : रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत : परभणी, धाराशिव
रवींद्र चव्हाण :  पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार :  हिंगोली,
दीपक केसरकर : मुंबई शहर, कोल्हापूर,
अतुल सावे  : जालना, बीड,
शंभूराज देसाई : सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा  : मुंबई उपनगर


हेही वाचा : NCP Crisis : नव्याने पक्ष बांधणीचा संकल्प, राष्ट्रवादीच्या फाळणीनंतर पवारांची बैठक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -