भाजी मंडई, मच्छी मार्केट नसल्यामुळे विक्रेते रस्त्यावर !

भाजी मंडई, मच्छी मार्केट नसल्यामुळे विक्रेते रस्त्यावर !

येथील ग्रामपंचायतीची नगर पंचायत होऊनही अनेक नागरी सुविधांचा अभाव दिसून येत आहे. तातडीने गरज असलेली भाजी मंडई, तसेच मच्छी मार्केट बांधण्यासाठी कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे येथील भाजी आणि मच्छी विक्रेत्यांना रस्त्याच्या दुतर्फा बसावे लागत आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय होण्यासोबतच कचरा आणि दुर्गंधी पसरत आहे.

शहरात स्वतंत्र भाजी मंडई आणि मच्छी मार्केटची व्यवस्था नसल्यामुळे भाजी-फळे आणि मच्छी विक्रेते प्रमुख बाजारपेठेत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांच्या दुतर्फा पादचारी मार्गावर, त्याचबरोबर कचेरी रस्ता, निजामपूर रस्ता, मोर्बे रस्ता आदी ठिकाणी ठाण मांडत आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या कचर्‍याचा दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची टांगती तलवार असते. शहराचे सौंदर्य राखण्यासाठी मंडईसह मच्छी मार्केटची व्यवस्था तातडीने करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यासंदर्भात नगराध्यक्षांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

यासंदर्भात नगराध्यक्ष योगिता चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता नागरिकांची होणारी गैरसोय त्यांनी मान्य केली. भाजी मंडई व मच्छी मार्केटचा प्रस्ताव नगर पंचायतीच्या विचाराधीन असला तरी केवळ जागेअभावी इमारत बांधणे अवघड झाल्याचे त्या म्हणाल्या. मोर्बे रस्त्यावरील पंचायत समितीची जुनी वास्तू यासाठी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसा संबंधितांशी नगर पंचायतीने पत्रव्यवहार केल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

First Published on: July 20, 2019 4:22 AM
Exit mobile version