काका मला वाचवा… उद्धव ठाकरे-शरद पवार भेटीवर शंभुराज देसाईंनी साधला निशाणा

काका मला वाचवा… उद्धव ठाकरे-शरद पवार भेटीवर शंभुराज देसाईंनी साधला निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुथ उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. ११ एप्रिल) बंद दाराच्या आड जवळपास सव्वा तास चर्चा करण्यात आली. यावरून राजकीय वर्तुळात अनेत चर्चा रंगलेल्या आहेत. असे असतानाच याबाबत शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी निशाणा साधला आहे. सगळं काही गुंडाळून काका मला वाचवा म्हणायला तर सिल्व्हर ओकला गेले नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

प्रसार माध्यमांसमोर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, “मातोश्रीचा इतिहास आहे, कितीही मोठा नेता असला तरी बाळासाहेबांना भेटायला येत होते. पण आज वेदना झाल्या. आज मराठी बाणा, बाळासाहेब यांचा वारसा सोडून लोटांगण घालत सिल्व्हर ओकला दाखल झाले. महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वेदना झाल्या आहेत. सावरकर यांच्याबद्दल जे वक्तव्य करण्यात आले त्यावर भूमिका मांडली नाही. जेपीसीबाबत संजय राऊत भूमिका मांडतात पण याच मुद्द्यावर पवार गरज नसल्याचे सांगतात. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये दरी पडण्यास सुरूवात झाली आहे,” असा दावा यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला.

तर, “सकाळी मातोश्रीवर स्वाभीमानाच्या बाता मारायच्या आणि संध्याकाळी सिल्वर ओकवर जाऊन लोटांगण घालणाऱ्यांनी मातोश्रीचं नाव धुळीला मिळवलं आहे. तसेच सगळं गुंडाळून काका मला वाचवा म्हणायला तर सिल्व्हर ओकला गेले नाहीत ना?” अशी टीका देखील शंभुराज देसाई यांच्याकडून या भेटीवर करण्यात आलेली आहे.

राज्यात गेल्या चार दिवस सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात आज, मंगळवारी रात्री जवळपास सव्वातास चर्चा झाली. पवार यांचे निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’मध्ये बंद दाराआड झालेल्या या चर्चेत नेमका कशावर खल झाला, हे मात्र स्पष्ट झाले नाही. यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) उपस्थित होत्या.

अदानी प्रकरणातील संयुक्त संसदीय समिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी, ईव्हीएम या महाविकास आघाडीत वादग्रस्त आणि विसंवादाच्या ठरलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकलेला नसला तरी या भेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात देखील यावेळी चर्चा झाल्याचे समजते.


हेही वाचा – राज्य सहकारी बँक घोटाळा : ईडीकडून आरोपपत्र दाखल; अजित पवार, सुनेत्रा पवारांचे नाव नाही

First Published on: April 12, 2023 9:02 AM
Exit mobile version