शरद पवार पुन्हा भिजले पावसात, सोलापुरात अवकाळी पाऊस

शरद पवार पुन्हा भिजले पावसात, सोलापुरात अवकाळी पाऊस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे संपूर्ण राज्यासह देशाच्या चर्चेच्या विषय ठरलेले आहेत. ज्यामुळे राज्याचे राजकारण हे फक्त आणि फक्त शरद पवार यांच्याच आजूबाजूला फिरत असल्याचे पाहायला मिळाले. शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर जरी आता पडदा पडलेला असला तरी शरद पवार यांची चर्चा होणे कमी होत नसल्याचेच दिसून येत आहे. पण शरद पवार आता चर्चेत आले आहेत, ते पुन्हा एकदा पावसात भिजल्याने. एका सहकाऱ्याला दिलेल्या शब्दामुळे शरद पवार यांनी भर पावसांत भिजत लग्न सोहळ्याला हजेरी लावली. (Sharad Pawar again soaked in rain, unseasonal rain in Solapur)

हेही वाचा – Malappuram disaster : बोट उलटल्याने २१ जणांचा मृत्यू, बहुतांश मुलांचा समावेश

सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनोहर वसंत सपाटे यांच्या पुतण्याचा लग्न सोहळा रविवारी (ता. 07 मे) पार पाडला. या लग्न सोहळ्याचे आमंत्रण शरद पवार यांना देखील देण्यात आले होते. त्याप्रमाणे दिलेला शब्द पाळत पवारांनी वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी भर पावसात लग्न सोहळ्याला हजेरी लावली. पण अचानक लग्न सोहळ्या दरम्यान पाऊस सुरू झाला. ज्यामुळे लग्नात उपस्थित असलेल्यांची पावसामुळे तारांबळ उडाली. पण तेव्हाच नेमेके शरद पवार हे देखील तिथे आल्याने शरद पवार यांना पावसांत भिजावे लागले.

शरद पवार यांनी शुक्रवारी राजीनामा नाट्यावर पडदा टाकल्यानंतर ते लगेच शनिवारपासून दौऱ्यावर निघाले. रविवारी सकाळपासूनच त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा सुरू केला. सुरुवातीला पंढरपूर त्यानंतर सांगोला येथे कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार यांना या लग्न सोहळ्याला यायला काहीसा उशीर झाला. त्याच वेळी सोलापुरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शरद पवार या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र आपल्या सहकाऱ्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी शरद पवार यांनी भर पावसात देखील या सोहळ्याला हजेरी लावली.

2019 मध्ये शरद पवारांनी घेतली होती भर पावसांत सभा
परिस्थिती कोणतीही असो पण दिलेला शब्द पाळणे हे शरद पवार यांचे वैशिष्ट्य आहे, असेच म्हणावे लागेल आणि त्याचमुळे शरद पवार यांनी 2019मध्ये सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाचे उमेदवार आणि शरद पवार यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांच्या भर पावसांत प्रचार सभा घेतली. त्यावेळी उदयनराजे यांना धोबीपछाड करण्यासाठी त्यावेळी राष्ट्रवादीने संपूर्ण ताकद पणाला लावलेली होती.

2019मध्ये शरद पवार हे उदयनराजे यांच्याविरोधात श्रीनिवास पाटील यांचा प्रचार करण्यासाठी साताऱ्यात हजर झाले होते. त्यावेळी प्रचार सभा सुरू असताना अचानक पावसाला सुरूवात झाली. ज्यानंतर शरद पवार यांचे भर पावसांत भाषण करतानाचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. तर तरूणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह पाहून सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. पण यामुळे त्यावेळी उदयनराजे भोसले यांचा मोठ्या मतांच्या फरकाने श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला.

First Published on: May 8, 2023 8:25 AM
Exit mobile version