बारामतीत येऊन काय उखडतो; पवार अमित शाह यांच्यावर उखडले

बारामतीत येऊन काय उखडतो; पवार अमित शाह यांच्यावर उखडले

बारामती येथील शेवटच्या सभेत शरद पवार यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सभा घेऊन ‘मी बारामतीत पवार यांना उखडायला आलोय’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी अमित शाह यांना चांगलाच टोला लगावला आहे. बारामतीत येऊन यांना काय उखडायचे आहे काय माहीत? उगाचच उंटाच्या कुठल्याही जागेचा मुका घ्यायला जावू नका, अशा शेलक्या शब्दात अमित शहांचा त्यांनी समाचार घेतला.

आता माझ्या बोटाचीच काळजी वाटते

“मी कृषिमंत्री असताना दहा वर्षात काय केले? असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत केला आहे. मात्र यापुर्वी मोदी जेव्हा बारामतीत आले, पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आले, तेव्हा त्यांनी माझ्या कृषी क्षेत्रातील कामाचे तोंडभरून कौतुक केले होते. माझ्या कामासाठी मला पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पुण्याच्या सभेत तर ते म्हणाले की, माझे बोट धरून ते राजकारणात आले होते. मात्र आता ते याउलट बोलायला लागले आहेत. त्यामुळे मला आता माझ्या बोटाचीच काळजी वाटू लागली आहे”, असा टोला पवार यांनी मोदींना लगावला.

 

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान २३ एप्रिल रोजी होत आहे. त्याआधी २१ एप्रिल रोजी प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यासाठी बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत राज्यात सात वेळा आले आहेत. भारताचा कोणताही पंतप्रधान इतक्या वेळा लोकसभेच्या प्रचारासाठी आला नव्हता. मोदी सात वेळा आल्यानंतर काय म्हणाले तर त्यांनी आधी गांधी-नेहरू घराण्यावर टीका केली आणि नंतर माझ्यावर टीका केली. मात्र पाच वर्षात त्यांनी काय काम केले, याबद्दल ते चकार शब्दही काढत नाहीत”, असे पवार म्हणाले.

 

First Published on: April 22, 2019 9:24 AM
Exit mobile version