डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणुकीचे शरद पवारांकडून संकेत,आमदारांना तयारी करण्याच्या सूचना

डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणुकीचे शरद पवारांकडून संकेत,आमदारांना तयारी करण्याच्या सूचना

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. त्यासाठी नेत्यांनी तयार रहावे, अशी सूचना पवारांनी बैठकीत केली आहे. डिसेंबरमध्ये ही मध्यावधी निवडणूक होण्याचे शरद पवारांनी संकेत दिलेत. शरद पवार यांनी फक्त महाराष्ट्राचा उल्लेख केला नाही तर गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार असे संकेत वर्तवले आहेत.

पवार काय म्हणाले –

आमदारांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की,  राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळें तयारी आत्तापासून करा.

 

विरोधी पक्षनेते पदी अजित पवार ? –

विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, हसन मुश्रीफ, अजित पवार, धनंजय मुंडे यांची बैठक झाली. यामध्ये अजित पवारांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते आहे. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवार यांच्यासोबतची बैठक काही वेळापूर्वी संपली. आमदारांकडून बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

First Published on: July 3, 2022 10:30 PM
Exit mobile version